पुणे : ड्यूटीचा वाॅर्ड बदलून पाहिजे? सुटी हवी आहे? कामावर न येता पगार हवा आहे? मेडिकल सर्टिफिकेट हवे आहे? हाॅस्पिटलच्या परवान्याचे नूतनीकरण करायचे असेल? तर काळजी करू नका २४ हजारांपासून काही लाख रुपयांचा चढावा द्या आणि मग बघा तुमचे काम झालेच म्हणून समजा. ही सर्व कामे करण्यासाठी औंध जिल्हा रुग्णालयात काही क्लास फाेर कर्मचारी एजंटगिरीची कामे करत आहेत. वरिष्ठांच्या आशीर्वादाने औंध हाॅस्पिटल ‘वसुलीदारांचा धंदा तेजीत सुरू आहे.
आराेग्य उपसंचालकांनी जिल्हा रुग्णालयावर केलेल्या कारवाईनंतर येथील गुपिते उघड होत आहेत. येथील ३ ते ४ वसुलीबाज क्लास फाेर कर्मचारी हे त्यांचे मुळ काम न करता केवळ वसुलीचे काम करत आहेत. त्यासाठी त्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘मलईदार’ पाेस्टही दिल्या आहेत. त्यापैकीच एक स्वत:ला ‘शेर’ समजणारा क्लास फाेर कर्मचारी जिल्हा शल्यचिकित्सक, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक यांचा ‘पीए’ म्हणून काम करताे आणि सर्वकाही ‘सेटलमेंट’ची कामे मार्गी लावताे अन् हाॅस्पिटलला अलिशान गाडी घेऊन येताे. वास्तविक संपूर्ण हाॅस्पिटलमधील डाॅक्टर, परिचारिका, कर्मचारी यांच्यावर जिल्हा शल्यचिकित्सकाचा नाही तितका दरारा या ‘शेर’चा आहे, हे विशेष. शिवाय जेथे काम हाेत नाही तेथे आमदारांच्या नावाचा वापर करण्यातही चांगलाच पटाईत आहे.
इतकेच नव्हे तर कॅज्युअल्टीमध्ये मूळ नेमणूक असलेल्या एका क्लास फाेर कर्मचाऱ्याला तर सहायक जमादाराचे पद नसतानाही ते बहाल केले आहे. हा तेथील कलेक्शन एजंटचे काम सफाईदारपणे पार पाडताे. एखाद्या क्लास फाेर कर्मचाऱ्याचा वाॅर्ड बदलायचा असेल तर २४ हजार, काम न करता पगार हवा असेल तर अर्धा पगार, इतर किरकाेळ कामांसाठी जसे लेट येऊनही पूर्ण पगार हवा असेल तर माेबाइलदेखील चालताे. हा कर्मचारी वरिष्ठ अधिकाऱ्यांना खुश करण्यासाठी त्यांचे बर्थडे सेलेब्रेट करतो, घरी धान्य नेऊन देताे इतकेच नव्हे तर हाॅस्पिटलमधील आलेले दूधदेखील अधिकाऱ्यांच्या घरी पाेहाेच करताे. नवीन जमादार आला असतानाही या जुन्याच सहायक जमादाराच्या हातात सर्व चाव्या आहेत.
पगाराचा लाखाेंचा घाेटाळा
आराेग्य खात्यात बायाेमेट्रिक हजेरीवर पगार काढण्याचा नियम असताना प्रत्यक्षात मात्र जमादाराच्या येथे असलेल्या लेखी रजिस्टरच्या नाेंदीनुसार पगार निघताे. अनेक कर्मचारी तर कामावर न येता पूर्ण पगार उचलतात आणि त्यापैकी अर्धा पगार संबंधिताला देतात. असा सर्व अनागोंदी कारभार येथे सुरू आहे.
अहवालात कर्मचाऱ्यांवर ओढले ताशेरे
आराेग्य उपसंचालकांनी दिलेल्या अहवालात म्हटले आहे की सहायक जमादार हे पद वसुलीसाठी तयार केले आहे, तर कर्मचारी शेरा रोनय्या, अशाेक सुरासे हे त्यांचे कर्तव्ये, जबाबदाऱ्या करत नाहीत आणि इतरांनादेखील करून देत नाहीत. हे सर्व अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सकांच्या सांगण्यावरून हाेत असल्याचे नमूद केले आहे.