पुणे: शासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यात दर महिन्याला चौथ्या बुधवारी नियमितपणे फेरफार अदालत आयोजित करणे यासाठी प्रांत अधिका-यांपासून, तहसिलदार, नायब तहसीलदार यांनी स्वतः लक्ष घालून गावांमध्ये उपस्थित राहण्याचे आदेश जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख यांनी दिले. ऐवढेच नाही तर जिल्हाधिकारी देखील स्वत: अनेक फेरफार अदालतीस उपस्थित राहिल्यानेच गेल्या वर्षभरात जिल्ह्यात तब्बल 10 लाख फेरफार नोंदी घेण्यात जिल्हा प्रशासनाला यश आले. यामुळे फेरफार नोंदीत पुणे जिल्हा राज्यात आघाडीवर पोहोचलो असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी दिली.
कोरोनामुळे गेल्या दीड दोन वर्षांत महसूल विभागाच्या दैनंदिन कामकाजावर खूपच परिणाम झाला. यामुळे प्रलंबित कामांची, फाईलची संख्या देखील वाढत गेली. यामुळेच तलाठी, सर्कल स्तरावरील प्रलंबित फेरफार नोंदींचा निपटारा करण्यासाठी शासनाने दर महिन्याला फेरफार अदालत घेण्यात आली. जिल्ह्यात घेण्यात येत असलेल्या फेरफार अदालतीला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या माध्यमातून जनतेच्या प्रलंबित, साध्या, वारस, तक्रारी, फेरफार नोंदी निर्गत करण्याचे काम गतवर्षभरापासून सुरू आहे. 24 नोव्हेंबर रोजी घेण्यात आलेल्या फेरफार अदालतीमध्ये एकाच दिवसात 3 हजार 361 नोंदी निकाली काढण्यात आल्या. तर आतापर्यंत जिल्ह्यात तब्बल 10 लाख नोंदी घेण्यात आल्या असून, त्यापैकी 9 लाख 73 हजार नोंदी निकाली काढण्यात आल्या आहेत.
मंडळस्तरावर संपर्क अधिकाऱ्यांच्या नेमणूका फेरफार नोंदी निकाली काढण्याच्या कामात सुसूत्रता आणण्यासाठी ऑक्टोबर 2020 पासून प्रत्येक मंडळस्तरावर संपर्क अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. जिल्ह्यात 98 मंडळ मुख्यालयात झालेल्या फेरफार अदालतीत शेतकरी, खातेदार यांनी सहभागी होत चांगला प्रतिसाद दिला.
10 लाख नोंदीचा टप्पा पारमागील एक वर्षात 3 लाख नोंदी घेत त्या निर्गत करण्यात आल्या आहेत. 2021 मध्ये फेरफार अदालतीला चांगला प्रतिसाद मिळाला असून 24 नोव्हेंबर रोजी 10 लाख नोंदी घेण्याचा महत्त्वाचा टप्पा पार करण्यात आला. पुणे जिल्ह्यात संगणकीय प्रणालीमध्ये नोंदी भरण्यास प्रारंभ केल्यापासून एकूण 10 लाख 983 नोंदी झाल्या आहेत. या नोंदीपैकी 9 लाख 73 हजार नोंदी निर्गत असून निर्गतीचे प्रमाण 97.14 टक्के आहे. नोंदी घेण्यात पुणे जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे.
तालुकानिहाय फेरफार नोंदी 24 नोव्हेंबर रोजीच्या फेरफार अदालतीद्वारे हवेली तालुक्यात 315, पुणे शहर 11, पिंपरी चिंचवड 84, शिरुर 270, आंबेगाव 163, जुन्नर 231, बारामती 776, इंदापूर 204, मावळ 241, मुळशी 134, भोर 111, वेल्हा 40, दौंड 194, पुरंदर 170 आणि खेड तालुक्यात 417 अशा एकूण 3 हजार 361 फेरफार नोंदी निर्गतीचे काम पूर्ण करण्यात आले.