जिल्हा पुन्हा अजितदादांच्या ताब्यात ; चंद्रकांत पाटलांना आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2020 06:00 AM2020-01-09T06:00:00+5:302020-01-09T06:00:07+5:30
राष्ट्रवादीमधून बंड केल्यानंतरही उपमुख्यमंत्री व आता पुण्याचे पालकमंत्री झालेले अजित पवार सध्या तरी चंद्रकांत पाटील यांना भारी पडले आहेत.
राजू इनामदार -
पुणे: पाच वर्षांच्या खंडानंतर पुणे जिल्हा पुन्हा अजित पवार यांच्याच ताब्यात आला आहे. महाविकास आघाडीने अपेक्षेप्रमाणे पुणे जिल्ह्याची पालकमंत्रीपदाची जबाबदारी पवार यांच्याकडेच सोपवली आहे. कोल्हापूरातून पुण्यात आलेल्या व कोथरूडमधून आमदार झालेल्या भारतीय जनता पार्टीच्या चंद्रकांत पाटील यांच्यापुढे यातून आव्हान उभे राहणार आहे.
राष्ट्रवादीमधून बंड केल्यानंतरही उपमुख्यमंत्री व आता पुण्याचे पालकमंत्री झालेले अजित पवार सध्या तरी चंद्रकांत पाटील यांना भारी पडले आहेत. राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडीच्या सरकारमध्ये अजित पवार तब्बल तीन वेळा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री होते. पिंपरी-चिंचवड व पुणे महापालिका शिवाय जिल्हा परिषदेतही त्यांचे वर्चस्व होते. त्या माध्यमातून त्यांनी दोन्ही महापालिकांमध्ये व जिल्ह्यातही अनेक चांगल्या कामांना गती दिली. सन २०१४ नंतरच्या त्यांच्या कार्यकाळात राज्यात भाजपाची सत्ता व महापालिकेत राष्ट्रवादीची असे होऊनही त्यांनी विकासकामांवर त्याचा परिणाम होऊ दिला नाही.
कामांचा तोच धडाका आता अजित पवार पुन्हा लावणार का असा प्रश्न कार्यकर्त्यांसमोर आहे. राज्यात त्यांची सत्ता असली तरी पुणे व पिंपरी-चिंचवड पालिकेत आता भाजपाची सत्ता आहे. त्यामुळेच कार्यकर्त्यांमध्ये राज्याकडून या दोन्ही पालिकांना सहकार्य मिळणार का अशी उत्सुकता आहे. अजित पवार यांना जवळून ओळखणाºयांच्या मते विकासकामात दादा कधीही राजकारण करत नाहीत, त्यामुळे उलट आता या दोन्ही शहरांमध्ये तसेच जिल्ह्यातही रखडलेल्या कामांना नक्की गती मिळणार आहे. पवार यांची प्रशासनावर चांगली पकड आहे. कामचुकारपणा करणाºया, नियमांचे, कायद्याचे अवडंबर माजवणाºया अधिकाºयांना ते बरोबर कामाला लावतील असे बºयाच कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
पवार व पाटील दोघांनाही राजकारणात दादा असेच संबोधले जाते. त्यामुळे दोन दादांमध्ये कोणते दादा भारी असा प्रश्न यातून निर्माण होणार आहे. राज्यात सत्ता येणारच अशा खात्रीने चंद्रकात पाटील यांना भाजपाने कोल्हापूरहून पुण्यात आणले. कोथरूड सारख्या सुरक्षीत विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. निवडूनही आणले. त्यानंतर तेच पालकमंत्री होणार अशी हवा होती, मात्र राजकारणाचे फासेच असे पडले की चंद्रकात पाटील यांना आता विरोधी आमदार इतकीच जबाबदारी पार पाडण्याची वेळ आली आहे. तरीही दोन महापालिका ताब्यात व केंद्र सरकारचे पाठबळ या ताकदीवर पाटील अजित पवार यांना आवाज देतील की शांत बसतील याविषयी राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.