पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात ४ फेब्रुवारीपर्यंत एकूण ३५८२३ आरोग्य कर्मचा-यांना कोरोनाची लस देण्यात आली. कोरोना लसीकरणामध्ये राज्यात पुणे जिल्ह्याचा तिसरा क्रमांक लागतो. मुंबई उपनगर पहिल्या क्रमांकावर, ठाणे दुस-या तर पुणे तिस-या क्रमांकावर आहे. यामध्ये पुणे ग्रामीणमध्ये १५२७६, पुणे महापालिका हद्दीत १२८५६, तर पिंपरी चिंचवडमध्ये ७६९१ जणांना लसीकरण करण्यात आले.
लसीकरणानंतर होणारे विपरीत परिणाम तुरळक प्रमाणात आढळून आलेले आहेत. १६ जानेवारीला लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यास सुरुवात झाली. त्यानंतर १५ दिवसांनीही लसीकरणाचा टक्का कमी का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. राज्यात कोरोना लसीकरणामध्ये पुणे जिल्हा तिस-या क्रमांकावर आहे. नावनोंदणी झालेल्या आणि मेसेज येणा-या आरोग्य कर्मचा-यांना लसीकरणासाठी उपस्थित राहणे जमत असल्या अथवा नसल्याबाबत रिप्लाय देण्याची सुविधा नसल्याने काहीसा गोंधळ निर्माण होत असल्याची परिस्थिती आहे.
लसीकरणासाठी तयार केलेली संगणक प्रणाली, कोविन अॅपमधील गोंधळ यामुळे लसीकरणाचा टक्का वाढण्यात अद्याप यश आलेले नाही. उर्वरित लाभार्थ्यांना १४ फेब्रुवारीपूर्वी लस देण्याच्या सूचना राज्य सरकारकडून देण्यात आल्या आहेत. कोरोना लसीकरण मोहिमेकरता लागणारे डोस पुरेशा प्रमाणात उपलब्ध असून ५३ ठिकाणी सत्रे नियोजित करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
-------------------------
जिल्ह्यात आतापर्यंत झालेले लसीकरण
विभागलाभार्थी
पुणे ग्रामीण १५२७६
पुणे शहर १२८५६
पिंपरी चिंचवड ७६९१
-----------------------------
एकूण ३५८२३
-------------------------------------
कुठे किती लसीकरण?
जिल्हा लसीकरण
मुंबई उपनगर ४१३२६
ठाणे ३७३४९
पुणे ३५८२३
मुंबई २०५९०
नागपूर १८१८२
------------------
गुरुवारी, ४ फेब्रुवारी रोजी व्हिडीओ कॉन्फसन्सिंगद्वारे बैठक पार पडली. राज्य शासनाकडे लसीचे डोस पुरेशा प्रमाणात उपलब्ध असून, जिल्ह्याला दुसरा साठा मिळण्यात कोणतीही अडचण येणार नाही, असे आश्वासन देण्यात आले आहे.
- डॉ. अशोक नांदापूरकर, जिल्हा शल्य चिकित्सक