पुणे - राज्यात गुरुवारी २३ ओमायक्रॉन बाधितांची नोंद झाली. यातील १३ जण पुणे जिल्ह्यातील आहेत. यात पिंपरी-चिंचवडमधील ७, पुणे शहरातील ३ आणि पुणे ग्रामीणमधील ३ रुग्णांचा समावेश आहे. राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था आणि राष्ट्रीय रसायन प्रयोगशाळेतून गुरुवारी हे अहवाल प्राप्त झाले. बहुतांश रुग्ण लक्षणेविरहित असून ६ जणांना सौम्य लक्षणे आहेत.
राज्यातील २३ रुग्णांपैकी १६ जणांना आंतरराष्ट्रीय प्रवासाचा इतिहास असून, ७ रुग्ण त्यांच्या संपर्कातील आहेत. यांपैकी ६ प्रवासी मध्यपूर्वेकडील देशांतून, ४ युरोपमधून, २ घाना, २ दक्षिण आफ्रिका तर १ जण सिंगापूर आणि १ जण टांझानिया येथून आलेले आहेत. राज्यातील २३ रुग्णांपैकी १८ जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. एका रुग्णाचे लसीकरण झालेले नाही तर, ४ रुग्णांचे वय १८ वर्षांपेक्षा कमी आहे. आतापर्यंत ओमायक्रॉनचे पिंपरी-चिंचवडमध्ये १९, पुणे ग्रामीणमध्ये १० तर पुणे शहरात ६ रुग्ण आढळून आले आहेत.
राज्यातील ४२ ओमायक्रॉन बाधितांना रुग्णालयातून डिस्चार्ज - राज्यात आतापर्यंत ओमायक्रॉन व्हेरिएंटचे ८८ रुग्ण आढळून आले असून, त्यापैकी ४२ रुग्णांना आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यावर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, १ डिसेंबरपासून आतापर्यंत पुणे, मुंबई आणि आंतरराष्ट्रीय विमानतळावर एकूण १ लाख ५६ हजार ११५ प्रवासी आले आहेत. त्यांपैकी २७ हजार ८१९ जणांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. कोरोनाबाधित १५६ रुग्णांचे नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. १ नोव्हेंबरपासून राज्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे क्षेत्रीय पातळीवर सर्वेक्षण सुरू आहे. विमानतळ आणि क्षेत्रीय सर्वेक्षणातून आतापर्यंत ६७० नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले. यापैकी १२४ नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे.