पुणे : जिल्ह्यात कोरोना पीकवर असताना सर्वसामान्य नागरिकांना कोरोनातून बाहेर पडण्यासाठी दर्जेदार आरोग्य सेवा पुरवितानाच जिल्हा प्रशासनाने विकासाच्या कामांकडे देखील तेवढेच लक्ष दिले आहे. यामुळेच राज्य शासनाच्या पर्यावरण विभागामार्फत राबविण्यात आलेल्या ‘माझी वसुंधरा’ अभियानात विविध दर्जेदार कामे करून राज्यात
पुणे जिल्ह्याने अव्वल क्रमांक पटकावला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शनिवार (दि.५) रोज होणा-या ऑनलाईन सन्मान सोहळ्यात पुणे जिल्ह्याचा गौरव करण्यात येणार आहे.
पर्यावरण व वातावरणीय बदल विभागामार्फत ‘माझी वसुंधरा अभियान’ २ ऑक्टोबर २०२० ते ३१ मार्च २०२१ या कालावधीत नगरपरिषद क्षेत्रामध्ये राबविण्यात आले. या अभियानात सर्वोत्तम कामगिरीसाठीचा पुरस्कार पुणे जिल्ह्याला जाहीर करण्यात आला आहे. या अभियानात सामाजिक वनीकरण, वनसंवर्धन, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन व जमिनीचे धुपीकरण इत्यादी बाबींवर शाश्वत काम करण्यात आली.
------
जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचा पुढाकार
जिल्ह्यात कोरोनाच्या पहिल्या लाटेत कोरोना ‘पीक’वर असताना जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच त्यांनी जिल्ह्यात ठप्प झालेल्या विकासकामांना गती देण्यास सुरुवात केली. याचाच एक भाग म्हणजे ‘माझी वसुंधरा अभियान’योजने जिल्ह्यातील नगरपालिका क्षेत्रामध्ये प्रभावीपणे अंमलबजावणी सुरू केली. यासाठी देशमुख यांनी स्वतः अनेक नगरपालिकांना भेटी देऊन प्रत्यक्ष कामांची पाहणी केली. जिल्ह्यातील सर्व मुख्याधिकारी, नगरपरिषद व नगरपंचायती यांची प्रत्यक्ष व ऑनलाइन आढावा बैठक घेऊन मार्गदर्शन केले. शिरूर व इंदापूर येथे वृक्षलागवड मोहीम व आळंदी येथे इंद्रायणी नदीसफाई या कार्यक्रमात प्रत्यक्ष सहभाग घेतला. जिल्हाधिकारी यांच्या पुढाकार आणि नगरपरिषद स्तरावरील सर्व अधिकारी, लोकप्रतिनिधींच्या सक्रिय सहभागामुळे राज्यात पुणे जिल्हा अव्वल ठरला.