पुणे : राज्यात ९ नोव्हेंबरला जाहीर झालेल्या प्रारूप मतदार यादीनंतर महिनाभर नवमतदारांसह छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित केला आहे. त्यानुसार तृतीयपंथीय, देह व्यवसाय करणाऱ्या स्त्रिया, दिव्यांग, भटक्या व विमुक्त जमाती अशा वंचित घटकांना लक्षित करून ८ डिसेंबरपर्यंत दावे व हरकती स्वीकारण्यात येणार आहेत. या कालावधीमध्ये अशा मतदारांना निवडणूक प्रक्रियेत समाविष्ट करून घेण्यासाठी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत करण्यात आलेल्या नोंदणीत राज्यात पुणे जिल्हा राज्यात आघाडीवर असल्याचे जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सांगितले.
१ जानेवारी २०२३ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित करण्यात आलेला आहे. वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्या सर्व पात्र नवमतदारांना नोंदणीसाठी ८ डिसेंबरपूर्वी निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरील अर्ज क्र. ६ भरता येणार आहे. त्यानुसार जिल्ह्यातील एकूण ४४२ महाविद्यालयांमध्ये आयोजित पहिल्या टप्प्यात ३१ हजारांहून अधिक नवमतदारांनी नोंदणी केली आहे. दुसऱ्या टप्प्यात सोमवारी (ता. ५) नोंदणी करण्यात आली. त्याचप्रमाणे हिंजवडी, माण, मारुंजी या परिसरातील विविध औद्योगिक आस्थापना, माहिती तंत्रज्ञान कंपन्या आदी ११९ ठिकाणच्या उद्योगांमध्ये मतदारांसाठी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते.
महिला बचतगटांसाठीही २ ते ८ डिसेंबरदरम्यान अशाच शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. तर पुण्यातील बुधवारपेठेत देह व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी आयोजित शिबिरांमध्ये १८३ अर्ज आले आहेत. बुथ लेव्हल ऑफिसर कागदपत्रांची पडताळणी करून त्यांची नोंदणी करून घेणार आहेत. तर मंगळवारी (ता. ६) पिंपरीमध्ये तृतीयपंथीयांसाठी मतदार नोंदणीसाठी विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
भारत निवडणूक आयोगामार्फत लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५० मध्ये सुधारणा करण्यात आल्याने वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या व्यक्तींना १ जानेवारी २०२३, १ एप्रिल २०२३, १ जुलै २०२३ व १ ऑक्टोबर २०२३ रोजी असे वर्षातून चार वेळा मतदार नोंदणी करण्याची संधी मिळणार आहे. राज्य स्तरावरील अंतिम मतदार ५ जानेवारी रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे.