बारामती : ‘आता जनताच बदल करीत आहे, पुणे जिल्हादेखील राष्ट्रवादीमुक्त झालेला दिसेल. घराणेशाही जपणारी राष्ट्रवादी पार्टी आहे, आम्ही क्षमता असणारे सक्षम उमेदवार दिले आहेत. शेतकरी हिताचे निर्णय आम्ही घेतले, तरी नोटाबंदीचा मुद्दा पुढे करत आहे, जनतेने त्याचे स्वागत केले, परंतु राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसच्या नेते विरोध करतात, कॅशलेस झाल्याने विरोध करीत आहेत,’ अशी टीका पालकमंत्री गिरीश बापट यांनी केली.बारामती तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या भाजपा आणि मित्रपक्षाच्या उमेदवारांच्या प्रचाराची सांगता माळेगाव येथे झाली. बापट यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली. सर्वात अधिक निधी असून देखील बारामती टँकर मुक्त का झाली नाही, याचे उत्तर का देत नाही. निधीचा वापर फक्त बगलबच्चांसाठी केला. पुणे जिल्हा टँकरमुक्त झाला नाही. मग पैसा गेला कुठे, याचे उत्तर अजित पवार देतील का, अशी विचारना बापट यांनी केली.पीक विमा योजनेमुळे शेतकरी सुखावला आहे. सामान्य माणसांच्या जीवनात परिवर्तन आणण्याचे काम भाजपा सरकार करत आहे. शेतकरी, महिला, मागासवर्गीयांच्या योजना प्रभावीपणे राबवित आहे. आधार कार्ड मुळे रेशनिंगचा काळा बाजार थांबला. आमचे कायद्याचे राज्य आहे. अजितदादा रोड शोच्या नावाखाली स्वत:चा शो करून घेत आहे, अशी खिल्ली त्यांनी उडवली. जे त्यांच्याकडे होते, तेच आमच्याकडे आले की, म्हणे ते गुंड आहे. ही कसली पद्धत. तुमच्याकडे असताना सज्जन आणि आमच्याकडे आले की गुंड कसे होतात, याचे उत्तर अजित पवार यांनी द्यावे.सरकार पडेल याची वाट पाहू नका, जनतेने सरकार दिले आहे, शरद पवार, अजित पवार पुन्हा सतेवर येण्याचे स्वप्न पाहू नका, असा टोला त्यांनी मारला. यावेळी चंद्रराव तावरे, बाळासाहेब गावडे, रंजन तावरे, अविनाश गोफणे, सुनील सस्ते, बबलू देशमुख आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
पुणे जिल्हा राष्ट्रवादीमुक्त होणार : गिरीश बापट
By admin | Published: February 20, 2017 2:00 AM