शेलपिंपळगाव : राज्यात पुढील आठ दिवस १००६ हेप्टा पास्कल इतका अधिक हवेचा दाब राहणार आहे. परिणामी चालू आठवड्यात अल्प प्रमाणात पावसाची बरसात होणार असल्याचा अंदाज ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केला.
बदलत्या हवामान संदर्भात लोकमतने डॉ. रामचंद्र साबळे यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले, पुणे जिल्ह्यातही चालू आठवड्यात अंशतः ढगाळ हवामान राहणार आहे. त्यामुळे पावसाची शक्यता व तेच वातावरण आठवडाभर टिकून राहील. वाऱ्याच्या दिशेतही बदल होत आहे. पश्चिमी चक्रवाताचा प्रभाव जाणवत आहे. त्यामुळे वाव्यवेकडून वारे वाहत आहे. दरम्यान, अरबी समुद्राच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान ३०.६ अंश सेल्सिअस राहील तर बंगालच्या उपसागरातील पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान ३०.५ अंश सेल्सिअस राहील.
हिंदी महासागराचे व प्रशांत महासागराचे पाण्याच्या पृष्ठभागावर तापमान वाढणार आहे. त्यानुसार ''एल निनो''चा प्रभाव अद्याप तरी सुरू झालेला नाही. मात्र हवामान बदलामुळे उत्तर भारतातील काही भागात अतिवृष्टी तर दक्षिण भारतात पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. काही भागांत अतिवृष्टी तर काही भागात दुष्काळी परिस्थिती हाच हवामान बदलाचा परिणाम आहे. पुणे जिल्ह्यात जून ते ऑगस्ट या काळात काही तालुक्यात जास्त तर काही तालुक्यात कमी पाऊस झाला आहे. याचा परिणाम खरीप पिकांच्या वाढीवर झालेला आहे.
१.७ मिमी पावसाची शक्यता
पुणे जिल्ह्यात चालू आठवड्यात १.५ ते १.७ मि.मी. पावसाची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यात कमाल तापमान ५८ अंश सेल्सिअस राहील. तर किमान तापमान २३ ते २४ अंश सेल्स राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आद्रर्ता ८३ ते ९३ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६५ ते ७८ टक्के राहील. बंगालच्या उपसागरावर चक्राकार वारे आहे. त्यामुळे या आठवड्यात पश्चिम महाराष्ट्रात अल्प ते हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे.
कृषी सल्ला
- हिरव्या चाऱ्यासाठी मका पिकाची पेरणी करावी.- सर्वच पिकात आंतर मशागतीसाठी कोळपणी व खुरपणी करावी.- कांदा लागवडीसाठी रोप तयार करावे.- फळभाज्यांच्या रोपवाटिका तयार करून लागवडीसाठी रोपे तयार करावीत.- भात खाचरात ५ सेमी उंचीपर्यंत पाणी साठवण करावी.- सोयाबीन पिकावरील कीड नियंत्रणासाठी तातडीने प्रयत्न करावेत.