पुणे : गेल्या दहा महिन्यांत पुण्यातून ५० रुग्णांनी अवयवदान केले. यामुळे १३० जणांना जीवनदान मिळाले असून, राज्यात अवयवदान करण्यात पुणे विभाग आघाडीवर गेला आहे. रुग्णालय, स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून करण्यात येणा-या जनजागृतीमुळे लोकांमध्ये अयवयदानाची चळवळ चांगली रुजत असल्याचे स्पष्ट झाले.रस्ता अपघातात जखमी झालेल्या आणि सह्याद्री रुग्णालयात उपचार घेत असलेल्या २४ वर्षीय रुग्णाने शुक्रवारी पहाटे त्याचे अवयवदान केले. त्याचे हृदय सह्याद्रीमधून मुलुंडच्या फोर्टीस रुग्णालयात शुक्रवारी पहाटेदीड वाजता रुग्णवाहिका घेऊन निघाली.पुणे ते मुलुंड हे १५० किमी पार करण्यासाठी एरवी सव्वातीन तास लागणारे अंतर ग्रीन कॉरिडॉरद्वारे केवळ दीड तासात पार केले, अशी माहिती पुणे झेडटीसीसीच्या समन्वयक आरती गोखले यांनी दिली. तर मूत्रपिंड व पॅनक्रिज हे सह्याद्री रुग्णालयातील रुग्णाला दान करण्यात आले. मात्र, फुफ्फुसासाठी रुग्ण न मिळाल्याने त्याचे दान करता आले नाही. कालपर्यंत तर विविध ठिकाणी लागोपाठ पाच अवयवदान झाले असल्याचेही गोखले यांनी सांगितले.पुणे झेडटीसीसीकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार पुणे विभागात आतापर्यंत ५० ब्रेन डेड रुग्णांनी अवयवदान केलेले आहे. तर आणखी ८ ब्रेनडेड रुग्णांच्या नातेवाइकांनी अवयवदानास संमती दिली होती.मात्र, वैद्यकीय चाचण्यांमध्ये ते अनफिट झाल्याने त्यांचे अवयवदान होऊ शकलेले नाही. जानेवारीपासून आतापर्यंत ७४ मूत्रपिंड, ४६ यकृत, संयुक्त मूत्रपिंड व पॅनक्रिज -२ आणि सहा हृदयांचा समावेश आहे.
अवयवदानामध्ये पुणे विभाग आघाडीवर, एका वर्षात ५० रुग्णांचे अवयवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 12:55 AM