लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे: फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावरील लिक्विड लेझर लाउंज (एल ३) मध्ये व्हायरल झालेल्या व्हिडीओ प्रकरणात अटकेतील सात जणांना २९ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दोन वरिष्ठ अधिकारी व दोन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे तर उत्पादन शुल्क विभागाने आणखी सहाजणांना अटक केली आहे.
बारच्या जागेचे मालक संतोष कामठे (शिवाजीनगर), बार चालविण्यासाठी घेतलेले उत्कर्ष कालिदास देशमाने (धानोरी), योगेंद्र गिरासे (भूगाव), रवी माहेश्वरी (उंड्री), पार्टीचे आयोजन केलेला अक्षय दत्तात्रेय कामठे (रा. हडपसर), डीजे दिनेश मानकर (रा. नाना पेठ), तर आयोजनात सहभागी झालेले रोहन गायकवाड (हडपसर) आणि मानस मल्लिक (येरवडा), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
एफसी रोड ड्रग्ज प्रकरण : दोन पोलिसांवर निलंबनाची कारवाई- फर्ग्युसन रोडवरील एल ३ नामक पबमध्ये अमली पदार्थांचे सेवन केल्याचा दावा करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. - पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी जबाबदार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला. शिवाजीनगर पोलिस ठाण्यातील गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल माने, रात्रपाळीदरम्यान शनिवारी गस्तीवर असणारे सहायक पोलिस निरीक्षक दिनेश पाटील यांना निलंबित करण्याचे आदेश पोलिस आयुक्तांनी दिले.
अटक केलेले सर्व परप्रांतीय- राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकानेही रविवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ‘एल-३’वर छापा टाकला. यात सव्वातीन लाख रुपयांचा बेकायदा मद्यसाठा जप्त केला; तसेच सहा वेटरना अटक करून सोमवारी न्यायालयात हजर केले. - या सहा आरोपींनाही न्यायालयाने २९ जूनपर्यंत उत्पादन शुल्क विभागाच्या कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. हे सर्व परप्रांतीय आहेत.
संबंधित बांधकामांवर बुलडोझर फिरवापुणे शहराला अमली पदार्थमुक्त करण्यासाठी बेकायदेशीर पब्जवर कठोर कारवाई करावी. तसेच अमली पदार्थांशी निगडित अवैध बांधकामांवर बुलडोझर फिरवावा, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांना दिले आहेत. पुणे शहराला अमली पदार्थमुक्त शहर करण्यासाठी आवश्यक ते सर्व उपाय योजावेत, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
पुण्याची ओळख होतय ‘ड्रग्ज व पब्जचे माहेरघर’‘विद्येचे माहेरघर’ असलेल्या पुण्याची ओळख आता ‘ड्रग्ज व पब्जचे माहेरघर’ अशी होत आहे. सरकारमुळे पुण्याची बदनामी होत आहे, टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.