पुणे: वाढत्या लैंगिक अत्याचारांच्या घटनांमुळे पोलिसांकडून शाळा, महाविद्यालयात ‘गुड टच, बॅड टच’ कार्यक्रम घेतले जातात. अशाच एका कार्यक्रमातून तरुणीवर चौघांनी लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले होते. यानंतर पोलिसांनी लगेचच कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात पोक्सो अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून, ओम आदेश घोलप (२०) आणि स्वप्निल विकास देवकर (२२) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर, दोघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.
याबाबत पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना, कोरेगाव पार्क पोलिस ठाण्याच्या महिला पोलिस अधिकारी एका महाविद्यालयात ‘गुड टच, बॅड टच’संदर्भातील कार्यक्रमाला गेल्या होत्या. त्यावेळी एक तरुणी तणावाखाली होती. ती काैन्सिलरकडे गेली. त्यावेळी बोलताना या तरुणीने माझी एक मैत्रीण कायम तणावाखाली असून, तिच्याबाबत काही गैरप्रकार झाल्याचा संशय आहे, असे सांगितले. त्यानंतर या काैन्सिलरने महाविद्यालयांच्या ट्रस्टींना याबाबत माहिती दिली. त्यांनी कोरेगाव पार्क पोलिसांशी मंगळवारी (दि. २४) रात्री संपर्क साधून माहिती दिली. त्यानंतर संबंधित तरुणीला आई-वडिलांसह बोलावण्यात आले. तिचा सोशल मीडियाद्वारे आरोपींशी संपर्क झाला होता. त्यांच्याशी वेगवेगळ्या वेळी शारीरिक संबंध आल्याचे तिने सांगितले. ही तरुणी अल्पवयीन असल्याने पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती त्यांनी दिली.
त्यातील एक आरोपी हा त्याच महाविद्यालयात शिक्षण घेत आहे, तर अन्य आरोपी इतर महाविद्यालयातील आहेत. त्यातील दोघे अल्पवयीन असून, अन्य दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांचा एकमेकांशी संपर्क असल्याचे अजून तरी समोर आले नाही. हा प्रकार एप्रिल ते सप्टेंबर यादरम्यान झाला असल्याची माहिती स्मार्तना पाटील यांनी दिली.