पुणे - लाडकी बहिण योजनेत खोडा घालणार्या सावत्र भावांना जोडा दाखवा! दाखवणार ना? असा प्रश्न लाखो महिलांना करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी.शनिवारी बालेबाडी क्रिडा संकुलात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेला सुरूवात केली. ऊपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनीही यावेळी पुढची ५ वर्ष योजना सुरू ठेवायची तर आगामी निवडणूकीत कमळ धनुष्यबाण घड्याळ लक्षात ठेवा असे आवाहन केले.
राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेला मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते शनिवारी दुपारी बालेवाडी क्रिडा संकुलात सुरूवात करण्यात आली. केंद्रीय सहकार व नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोर्हे, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, महिला बाल कल्याण मंत्री अदिती तटकरे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी उपस्थित होते. विरोधकांपैकी कोणीही कार्यक्रमाला हजर नव्हते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, " तूम्ही संसार चालवताना कसरत करता, सरकार चालवताना देखील कसरत करावी लागते. कमिटेड खर्च करावाच लागतो. पण लाडक्या बहिणींना द्यायचे होते. म्हणून निर्णय केला. विरोधक म्हणतात, लाडक्या भावांचे काय? त्यांना कधी प्रेम होते का भावांबद्दल? मग सोडून गेले असते का? आज मिळालेल्या लाखो भगिनी उर्जा देणार्या आहेत. या शक्तीच्या जोरावरच सर्वांना पुरून उरलोय. सावत्र भावांवर मात करून आलोय. तूम्ही त्यांना लक्षात ठेवा. काहीही बोलतात. मनाची नाही तर जनाची तरी ठेवा. खोडा घालणार्या सावत्र भावांना जोडा दाखवा" नाद सगळ्याचा करा, आमचा नाही असे मुख्यमंत्र्यांनी बजावले.
अजित पवार म्हणाले, " यांनी पुढची ५ वर्षे योजना सुरू ठेवायची तर आगामी निवडणूकीत कमळ धनुष्यबाण घड्याळ विसरू नका असे आवाहन केले. यात कसलेही राजकारण नाही, खरे तेच बोलतो. विरोधक कारण नसताना टीका करतात. कोणीही पैसे परत घेणार नाहीत. या पैशांचा चांगला विनियोग करा. भावांनाही वीज माफी केली. दुधाचा दर वाढवून दिला.तरीही टीका होते. हे सरकार सर्वसामान्यांचे सरकार आहे. आम्ही कामाची माणसे आहोत" आजपर्यंतच्या राजकीय जीवनातील हा सर्वात मोठा दिवस आहे असे पवार म्हणाले.
फडणवीस म्हणाले, "हे देना सरकार आहे, लेना सरकार नाही. मागचे सरकार वसुली सरकार होते. आम्ही देणारे आहोत. तूमच्या सावत्र भावांना योजना होऊ द्यायची नव्हती. पण काही झाले नाही. पूर्वीच्या योजना दलालीच्या होत्या.क्षपंतप्रधान मोदींमुळे आधार, बँक खाते, पैसे जमा, असा त्रिशूळ तयार झाला. दलाली संपली. आई आणि बहिणीचे प्रेम कशानेही विकत घेता येत नाही हे विरोधकांना कळत नाही. कर्नाटक तेलंगणात विरोधकांनी योजना सुरू केली. बंद झाली. आमच्या शिवराज पाटील यांनी मध्यप्रदेशात सुरू केली, अजून चालू आहे. त्यामुळे वेगळा परिणाम आला तर योजना बंद होतील हे लक्षात ठेवा.
मंत्री अदिती तटकरे यांनी प्रास्तविक केले. फक्त ४ दिवसात १ कोटी ८ लाख महिलांच्या खात्यात प्रत्येकी १५०० रूपये पैसे जमा करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. योजनेची मुदत सप्टेंबर पर्यंत वाढवली असल्याची माहिती त्यांनी दिली. सरकारने या योजनेसाठी तयार केलेल्या जाहिरातींचेही सादरीकरण कार्यक्रमात करण्यात आले. अभिनेते अभिजित खांडकेकर व म्रुण्मयी देशपांडे यांनी सुत्रसंचालन केले.
बालेवाडीत झालेल्या या कार्यक्रमाला जिल्ह्यातील विविध भागातून महिला जमा झाल्या होत्या. मुख्यमंत्री आणि दोन्ही ऊपमुख्यमत्र्यांनी महिलांना मोबाईलचा टॉर्च सुरू करून हात उंचावत अभिवादन केले. महिलांनीही त्यांना तसाच प्रतिसाद दिला. ऑलिम्पिक मधील नेमबाजीतील ब्रांझ पदक विजेता स्वप्नील कुसळे याचा सत्कार करण्यात आला.
सरकारला ताकद द्या. देण्याची ताकद लागते. ती आम्ही दाखवली आहे. ताकद वाढवा, पंधराशे चे २ हजार होतील, अडीच हजार होतील व ३ हजारही होतील. आम्हाला आमच्या बहिणींना लखपती झालेले पहायचेय. विरोधकांना लाडकी बहिण योजनेची भीती, तूम्ही घाबरू नका,कारण तूमच्याबरोबर आहे महायुती. - एकनाथ शिंदे (मुख्यमंत्री)