इंदापुर : तालुक्यात विधानसभा निवडणुकीसाठी झालेल्या अटीतटीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमदार दत्तात्रेय भरणे यांनी सुमारे ३००० हजारांपेक्षा जास्त मतांनी विजयी झाले आहेत. त्यांनी माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांचा पुन्हा पराभव केला आहे. तालुक्यात विधानसभा निवडणुकीसाठी झालेल्या अटीतटीच्या सामन्यात विद्यमान आमदार दत्तात्रेय भरणे व भाजपचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांच्यात लढत झाली. यामध्ये सकाळी भिगवण,पळसदेव परिसरातुन पाटील यांना आघाडी मिळाली होती. मात्र नंतर भरणे यांनी इतर भागात आघाडी घेण्यास सुरुवात केली. १४ व्या फेरीअखेर भरणे यांनी सुमारे १४०००हजार मतांची आघाडी घेतली. त्यामुळे कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला मात्र नंतरच्या प्रत्येक फेरीत मताधिक्य कमी होत राहिले मात्र २४ व्या फेरीअखेर ३००० पेक्षा जास्त मताधिक्य कायम राखुन भरणे यांनी विजय मिळविला. टपाली मतदानातही भरणे यांनी २५१ मतांची आघाडी घेतली. २०१४ मध्येही भरणे यांनी पाटील यांचा पराभव केला होता. यावेळी मात्र पाटील यांनी भाजप प्रवेश केल्याने निवडणूक रंगणार अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, विद्यमान आमदार भरणे यांनी मताधिक्य घेण्यास सुरुवात करुन विजयाच्या दिशेने वाटचाल सुरु केली. याठिकाणी एकुण १५ उमेदवार रिंगणात होते. तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप यांनी ही लढत प्रतिष्ठित केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी याठिकाणी लक्ष घातले होते. मात्र भरणे यांनी जिल्हा परिषदेच्या अडीच वर्षांच्या कालावधीत व आमदार म्हणून गेली. पाच वर्षांत केलीली विकासकामे यामुळे सर्व सामान्य जनता पाठिशी उभी राहिल्याचे चित्र आहे. भरणे यांना राजकीय कारकीर्दीत ज्या राजकीय कार्यकर्त्यांनी साथ दिली होती. त्यांनी भरणे यांची साथ सोडून पाटील यांना सहकार्य करण्याची भूमिका घेतली होती. त्यामुळे भरणे यांना संपूर्ण पणे एकाकी लढत द्यावी लागली होती. मात्र, संयम बाळगत भरणे यांनी सर्वसामान्य जनतेच्या बळावर विजय मिळविला आहे. दरम्यान एका ईव्हीएम मशीन मध्ये बिघाड झाल्याने अंतिम निकाल घोषित करण्यास विलंब झाला आहे.
पुणे निवडणूक निकाल २०१९ : इंदापूरमध्ये अटीतटीच्या लढतीत हर्षवर्धन पाटलांचा पराभव
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2019 3:42 PM