पुणे : गेल्या दहा वर्षांमध्ये एप्रिल महिन्यामधील किमान तापमान सरासरी २५ अंश सेल्सिअसच्या आसपास नोंदवले गेले आहे, तर कमाल तापमान चाळशीच्या वर गेल्याचे दिसून येत आहे. खरंतर पुण्याला पूर्वीच्या काळी हिल स्टेशन असा दर्जा देण्यात आलेला होता. तो आता कधीच नाहीसा झाला आहे. उष्ण बेट म्हणूनच पुण्याची वाटचाल होत असल्याचे आकडेवारीरून दिसून येत आहे.
पुणे शहर थंड हवेचे आणि अतिशय चांगले वातावरण असलेले ठिकाण म्हणून ओळखले जात होते. कारण या ठिकाणी टेकड्या, मोठ्या प्रमाणावर झाडी होती. परंतु, आता शहरीकरणामुळे लोकसंख्या प्रचंड वाढली, इमारती वाढल्या, झाडं कमी झाली. वाहनांची संख्या वाढली. त्यामुळे येथील वातावरणात घातक वायू वाढले.
१९९९ ते २००६ च्या दरम्यान पुण्याची बिल्ट अप एरिया ३३ टक्के वाढली आणि त्यासोबत तापमान १-४ अंशांनी वाढले. यातील १० टक्के जमीन आधी शेतीखाली होती आणि २३ टक्के पडीक होती. याचप्रकारे पसरणारी शहरे आणि त्यातील उभ्याने वाढणाऱ्या इमारती वाहत्या वाऱ्यांच्या मार्गात अडथळा निर्माण करतात. शहरीकरणाच्या प्रक्रियेत हवा मोकळी ठेवण्यासाठी लागणारे मार्ग बंद होतात. इमारतींसाठी वापरलेले बांधकामाचे साहित्य उष्णता शोषून घेते आणि इमारती तापतात. त्यामुळे तापमानात वाढ होते, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाचे माजी महासंचालक डॉ. रंजन केळकर यांनी त्यांच्या ‘महाराष्ट्राचे हवामान’ या पुस्तकात नमूद केले आहे.
एप्रिल महिन्यात पाऊस वाढतोय का ?
गेल्या दहावर्षांमध्ये पुणे शहरात एप्रिल महिन्यात पाऊस पडण्याचे प्रमाण कमी आहे. परंतु, २०२१ मध्ये मात्र १९ मिमी पाऊस झाला आहे. त्यानंतर यंदा तर एप्रिल महिन्यात सलग आठवडाभर दररोज सायंकाळी ठिकठिकाणी जोरदार पाऊस पडल्याच्या नोंदी आहेत. त्यामध्ये शिवाजीनगर येथे काही मिनिटांमध्ये ४६ मिमी पाऊस पडला. तर पाषाण येथे १६ मिमी पाऊस झाला. यावरून एप्रिल महिन्यात पाऊस वाढत असल्याचे स्पष्ट होत आहे.