धायरी: कोरोनामुळे माणूस माणसाला विचारानासं झाला आहे. पण याचवेळी आयुष्यभर आपल्या धन्यासाठी शेतात राबणाऱ्या बैलावर जीवापाड प्रेम करणारं बळीराजाचं कुटुंब अनेकदा पाहायला मिळतात. असंच एक कुटुंब पुण्यात समोर आले आहे. खडकवासला परिसरातील एका मायाळू बैलाने इमानेइतबारे सेवा करीत शेवटपर्यंत आपल्या धन्याला साथ दिली. मात्र, आजारपणामुळे वयाच्या तेराव्या वर्षी या लाडक्या 'आमदार' नावाच्या बैलाचा दुर्देवी अंत झाला आहे. आपल्या लाडक्या आमदाराच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी शंभू- बाजी ग्रुपसह बैलप्रेमींनी त्याच्यावर विधीवत अंत्यसंस्कार करून आयुष्यभर 'आमदाराची' आठवण राहावी म्हणून समाधीही बांधली.
आकर्षक शरीरयष्टी, पांढराशुभ्र रंग आणि 'आमदारा'ची असलेली ७ फूट उंची यामुळे तो बघणाऱ्याच्या नजरेत भरत होता. अशा लाडक्या बैलाच्या निधनानंतर खडकवासला येथील बैलप्रेमी पै. निखिल कोरडे व शंभू-बाजी ग्रुपच्या सदस्यांनी त्याची खडकवासला धरणाजवळ सिंहगड सृष्टी येथे असलेल्या गोठ्याच्या आवारात समाधी उभारली आहे.
'आमदार' हा बैल शंभू-बाजी या ग्रुपने पाच वर्षांपूर्वी धायरी येथील एका शेतकऱ्याकडून पाच लाख एकावन्न हजार रुपयांना खरेदी केला होता. अत्यंत गरीब व देखण्या 'आमदाराला' लहान मुलेही धरुन फिरवायची. आमदाराचे सौंदर्य व इतर गुणांमुळे २०१६ साली जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांची पालखी ओढण्याचा तर २०१८ आणि २०१९ ला श्रीमंत दगडूशेठ हलवाई' गणपतीचा रथ ओढण्याचा मान मिळाला होता. महाराष्ट्रासह इतर राज्यांतील बैल प्रेमी या 'आमदाराला' दहा लाखांपेक्षा जास्त किमतीला खरेदी करण्यासाठी इच्छुक होते. परंतु परिवारातील सदस्याप्रमाणे आपुलकीचे नाते जडलेल्या लाडक्या आमदाराला कोणी कितीही किंमत दिली तरी विकायचे नाही, असा निर्णय शंभू-बाजी ग्रुपच्या सदस्यांनी घेतला होता. दुर्दैवाने २१ ऑगस्ट रोजी या आमदाराचे अचानक निधन झाले. अकाली सोडून गेलेल्या लाडक्या बैलाला गोठ्यातच पुरुन त्या जागी त्याची समाधी उभारण्यात आली व त्यावर त्याचा आकर्षक पुतळा उभारण्यात आला. एवढेच नाही तर दशक्रिया व तेराव्याचा विधी करुन सर्व गृप सदस्यांनी मुंडन केले.
कुटुंबातील सदस्यांप्रमाणे करतात बैलांचे संगोपन...खडकवासला येथील शंभू-बाजी ग्रुप मधील सदस्य हे आपले नोकरी-व्यवसाय सांभाळत बैलांचे संगोपन करतात. त्यासाठी खडकवासला धरणाच्या मागील बाजूस त्यांच्या जागेत भव्य गोठा उभारण्यात आलेला आहे. सध्याही तब्बल वीस लाख रुपये किंमतीचे चार बैल त्यांच्या गोठ्यात आहेत. दररोज स्वच्छ आंघोळ घालणे, उत्तम दर्जाचा हिरवा व वाळलेला चारा खाऊ घालणे, दिवसातून दोन वेळा खुराक चारणे आणि गोठ्याची स्वच्छता ठेवणे अशा गोष्टींमुळे शंभू-बाजी ग्रुपचे बैल पाहणाऱ्यांच्या नजरेत भरतात.
पोटच्या पोरागत सांभाळलेला बैल आमच्या मधून निघून गेला. याचं आम्हाला खूप दुःख वाटत आहे. म्हणून आम्ही याची समाधी बसवण्याचा निर्णय घेतला आहे. समाधीच्या रूपाने त्याची आठवण आमच्या कायम स्मरणात राहील. - पै. निखिल कोरडे, शंभू बाजी ग्रुप, खडकवासला