पुणे : आपल्याच पुणे फेस्टिव्हलमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून यामुळे काही प्रमाणात संकोचाची भावना मनात आहे. एक दोन नव्हे तर २७ वर्षांपासून या उत्सवात नर्तिकेच्या भूमिकेत आले आहे. यापुढील काळात देखील बॉलीवूडची अभिनेत्री म्हणून नाही तर नृत्यांगणा या नात्याने कायम या महोत्सवाशी रुणानुबंध कायम राहील. आजवर महोत्सवाच्या माध्यमातून प्रख्यात कलाकारांबरोबरच नवोदितांना देखील हक्काचे व्यासपीठ मिळाले, अशी भावना ज्येष्ठ अभिनेत्री व खासदार हेमा मालिनी यांनी व्यक्त केली.हेमा मालिनी यांच्या हस्ते तिसाव्या पुणे फेस्टिव्हलचे उद्घाटन झाले. पालकमंत्री गिरीष बापट, पर्यटनमंत्री जयकुमार रावळ, समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे,फेस्टिव्हलचे अध्यक्ष सुरेश कलमाडी, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, माजी गृहमंत्री रमेश बागवे, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक सुहास दिवसे, कृष्णकुमार गोयल, कृष्णकांत कुदळे, सुभाष सणस उपस्थित होते. यावेळी माजी राज्यपाल डॉ. डी. वाय.पाटील, डॉ.श्रीनिवास पाटील, ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले आणि बीव्हीजी ग्रुपचे अध्यक्ष हनुमंत गायकवाड यांना मानाच्या पुणे फेस्टिव्हल अँवॉर्डने गौरविण्यात आले.हेमा मालिनी यांनी पुढील वर्षी महोत्सवात मात्र सादरीकरण करणार असल्याचे आश्वासन दिले. त्यावेळी गंगा बॅले नृत्याने रसिकांना सुखद धक्का देणार असल्याचे सांगितले.बापट म्हणाले, राज्य सरकारकडून पुणे फेस्टिव्हलचे पैसे द्यायचे राहिले असतील तर मागच्या वर्षी आणि यावषीर्चे पैसे हे सरकार लवकरच देईल. गणपती, मांडवाच्या कर सरकार भरते. त्यामुळे, यापुढील काळात चांगला उत्सव साजरा करू.विक्रम गोखले म्हणाले, मी पुण्यात जन्मलो पुण्यात वाढलो. जगभर माझे कौतुक झाले. मात्र, घरच्या लोकांनी केलेलं कौतुक आनंद देणारे असते. हा आनंद मला या पुरस्कारातून मिळाला. या रंगमंचावर आज ऊर्जा घेऊन तरुण मंडळी उभी राहिली, हे सर्व कौतुकास्पद आहे.या वेळी पुणे फेस्टिव्हलकडून केरळ येथील पुरग्रस्तांकरिता दोन लाख रुपयांची मदत करण्यात आली. केरळ मुख्यमंत्री सहाय्य निधी यांच्या नावाने धनादेश पालकमंत्री गिरीश बापट यांच्याकडे सुपुर्त करण्यात आला. याबरोबरच गणेश उत्सवाची शताब्दी साजरी करणाऱ्या नाना पेठेतील साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा या उद्घाटन सोहळ्यात सत्कार करण्यात आला.जेष्ठ सनईवादक तुकाराम दैठणकर यांच्या सनईवादनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर, कथ्थक नृत्यांगना ऋजुता सोमण व भरतनाट्यम नृत्यांगना अरुंधती पटवर्धन यांनी सह कलावंतांसमवेत गणेशवंदना सादर केली. याशिवाय, ज्येष्ठ कवी ग. दि. माडगूळकर,ज्येष्ठ गायक, संगीतकार सुधीर फडके आणि साहित्यिक, अभिनेते पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त स्वरांजली हा कार्यक्रम सादर केला गेला. योगेश देशपांडे आणि दुरीया शिपचांडलर यांनी सूत्रसंचालन केले.
पुणे फेस्टिव्हलमुळे नवोदितांना व्यासपीठ- हेमा मालिनी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2018 1:11 AM