पुणे - लाल महालातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटवल्यानंतर पुणे महापालिकेकडून आश्वासनाची पूर्तता न झाल्यामुळे अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने दादोजी कोंडदेव यांच्या पुण्यतिथीनिमित्त पालिकेच्या आवारातच त्यांची प्रतिमा बसवून त्याचे पूजन केले. यावरून संभाजी ब्रिगेड आणि महासंघाच्या पदाधिका-यांमध्ये मोठी बाचाबाची झाली. पुणे महापालिकेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची सत्ता असताना दादोजी कोंडदेव यांचा पुतळा लाल महालातून हटवण्यात आला होता. मात्र पुण्यात कोठे तरी दादोजी कोंडदेव यांचा पुतळा बसवावा, असे महापालिकेने महासंघाला आश्वासन दिले होते. मात्र त्याची पूर्तता झाली नाही.त्यामुळे बुधवारी त्यांच्या पुण्यतिथी दिनी मनपा आवारात कोंडदेवांच्या प्रतिमेचे महासंघाने पूजन करून महापालिकेचे लक्ष वेधले. मात्र ही गोष्ट कळताच संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते घटनास्थळी पोहोचले आणि त्यांच्यात बाचाबाची झाली. आवारात प्रतिमा बसविण्यासाठी प्रशासन आणि पोलिसांची परवानगी घेतली होती का? असा सवाल संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी केला.
''समाजात तेढ पसरवण्याचा हे प्रयत्न करीत आहेत'' असा आरोपही त्यांनी यावेळी केला. मात्र आम्ही कायमस्वरूपी प्रतिमा बसविलेली नाही त्यामुळे परवानगीची गरज नाही असे ब्राम्हण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे म्हणाले, यावरून दोन संघटनेत चांगलीच जुंपली. अखेर महासंघाने प्रतिमा उचलून नेत काढता पाय घेतला.
तर दुसरीकडे ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे यांनी म्हटले आहे, की अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने आज इतिहास घडवला आहे. गेली अनेक वर्षे सतत मागण्या, विनंती करूनही सरकार आणि महापालिकेला जाग आली नाही पण आपण आज आम्ही सरकारचे, देवाचे आणि धर्माचे सुद्धा काम केले. कोणताही ना कायदा हातात न घेता किंवा नियम न तोडता आम्ही हे काम केले.