पुणे - पुण्यामध्ये शनिवारी (2 मार्च) अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाला चेतन ओसवाल (39) हे विद्यूत पुरवठा खंडीत झाल्याने एका इमारतीत लिफ्टमध्ये अडकल्याची माहिती मिळाली. चेतन हे तासभरापासून लिफ्टमध्ये अडकले असून ते खूप घाबरलेल्या अवस्थेत आहेत. त्यांना लवकर वाचवा असा फोन चेतन यांच्या वडिलांनी केला होता. भवानी पेठेतील भवानी माता मंदिरासमोर तिरुपती सहकारी संस्था या इमारतीत ही घटना घडली.
घटनेचा माहिती मिळताच नियंत्रण कक्षाकडून तातडीने मदत पाठवली गेली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तिथे जाऊन पाहिले. पहिल्या व दुसऱ्या मजल्याच्या मधोमध लिफ्ट अडकली असून चेतन आणि त्यांचे वडील खूपच घाबरले होते. जवानांनी “आता आम्ही आलो आहोत. तुम्ही घाबरू नका. पाच मिनिटांत तुम्ही सुखरुप बाहेर याल” असे सांगितले. नंतर लिफ्ट रुममध्ये जाऊन जवानांनी तिथे असलेल्या एक चकती टॉमी बारच्या साहाय्याने फिरवून लिफ्ट पहिल्या मजल्यावर घेतली व चेतन यांची पाचच मिनिटांत सुखरुप सुटका केली.
चेतन यांच्या वडिलांना आपला मुलगा सुखरुप बाहेर आला हे पाहून अश्रू अनावर झाले. त्यांनी अग्निशमन दलाच्या जवानांसमोर हात जोडत अश्रू पुसले. तसेच तुम्ही देवासारखे पाच मिनिटांत धावून आलात असे म्हणत त्यांचे आभार मानले. यावेळी दलाचे प्रभारी अधिकारी सचिन मांडवकर, वाहनचालक राजू शेलार, तांडेल राजाराम केदारी, जवान मंगेश मिळवणे, रऊफ शेख, योगेश चोरघे, प्रताप फणसे, अक्षय शिंदे, विठ्ठल शिंदे,रोहीत रणपिसे यांचा सहभाग होता.