शेलपिंपळगाव (पुणे) : गाडीवर बसण्यासाठी जागा न दिल्याच्या कारणावरून एकाने जागा न देणाऱ्या व्यक्तीच्या घरासमोर येऊन गोळीबार करत परिसरात दहशत निर्माण केली. शेलपिंपळगाव (ता. खेड) येथील पोतलेमळा परिसरात गुरुवारी (दि.१९) रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. संजय तानाजी वाघमारे (वय ४०, रा. शेलपिंपळगाव. ता. खेड. मूळ रा. धाराशिव) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सचिन किसन मोहिते (वय ३७ वर्षे, रा. पोतलेमळा, शेलपिंपळगाव ता. खेड) आणि दोन अनोळखी इसमांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास फिर्यादी वाघमारे हे त्यांचा मित्र गोरक्ष जाधव यांच्यासह दुचाकीवरून पिण्याच्या पाण्याचा जार घेऊन जात होते. त्यावेळी सचिन मोहिते याला गाडीवर बसण्यासाठी जागा दिली नाही, या कारणावरून त्याने वाघमारे यांना दमदाटी करून शिवीगाळ करत मारहाण केली. त्यानंतर गुरुवारी मध्यरात्री साडेबारा वाजताच्या सुमारास सचिन मोहिते हा वाघमारे यांच्या घरासमोर आला. ‘तुम्ही बाहेरून येऊन आमच्या गावात राहता. पैसे कमावता. येथे राहायचे असेल तर मला पैसे द्यावे लागतील’ असे म्हणत त्याने शिवीगाळ करून आरडाओरडा केला. त्यानंतर मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास पुन्हा वाघमारे यांच्या घरी येऊन दारू पिण्यासाठी दोन हजार रुपये मागितले. पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.
आरोपी सचिन त्याच्या दोन साथीदारांना घेऊन गुरुवारी पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास पुन्हा वाघमारे यांच्या घरी आला. बंदुकीसारखे शस्त्र घेऊन त्याने जोरजोराने ओरडून ‘घराच्या बाहेर ये. दुसरं कोणी आलं तर त्याला सुद्धा ठोकतो’ असे म्हणत बंदुकीतून दोन गोळ्या हवेत झाडल्या. दरम्यान पोलिसांनी सचिन मोहिते याला अटक केली आहे.