पुणे : येरवडा कारागृहाचे तुरुंग अधिकारी मोहन पाटील यांच्यावर अज्ञातांनी सकाळी 6.20 वाजण्याच्या सुमारास कारागृह प्रवेशद्वाराजवळ गोळीबार गेला. सुदैवाने या हल्ल्यातून पाटील बचावले असून अज्ञातांविरोधात येरवडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 6.20वाजण्याच्या दरम्यान दुचाकीवरुन आलेल्या दोन अज्ञात इसमांनी कारागृहाचे तुरुंग अधिकारी मोहन पाटील यांच्यावर गावठी कट्यातून गोळी झाडली. या गोळीबारातून तुरुंगाधिकारी पाटील थोडक्यात बचावलेत.
त्यांनी आरडाओरडा केल्याने आरोपी तेथून पसार झाले. आरोपींनी तोंडाला रुमाल बांधला होता. कारागृहाच्या प्रवेशद्वाराजवळील सीसीटीव्हीमध्ये ही घटना कैद झाली आहे. घटनास्थळी पोलिसांनी एक पुंगळी हस्तगत केली आहे. घटनेची माहिती तुरुंगाधिकारी पाटील यांनी तात्काळ येरवडा कारागृह प्रशासनाला दिली त्यानंतर तातडीने येरवडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले .या प्रकारात सुदैवाने तुरुंगाधिकारी पाटील यांना कोणतीही इजा झालेली नाही. कारागृह विभागाचे महानिरीक्षक डॉ भूषणकुमार उपाध्याय, कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे, पोलीस उपायुक्त दीपक साकोरे, सहायक पोलीस आयुक्त गणेश गावडे, येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचवरे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या. तुरुंगाधिकारी पाटील यांची फिर्याद घेण्याचे काम सुरू करण्यात आले असून त्या गोळीबाराच्या गंभीर घटनेच्या तपासासाठी येरवडा विश्रांतवाडी तसेच गुन्हे शाखेची पथके तपासासाठी रवाना करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान, येरवडा कारागृहाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आरोपींच्या नातेवाईकांची दररोज गर्दी असते. त्यामुळे कारागृहाच्या सुरक्षेला तसेच तुरुंग अधिकारी व त्यांच्या कुटुंबाला धोका निर्माण होऊ शकतो. तसेच कारागृहाबाहेरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते, अनेकदा या ठिकाणी वाहतूक कोंडीसुद्धा होत असते. त्यामुळे एखादी अनुचित घटना घडण्याची शक्यता येथील कर्मचाऱ्यांकडून वर्तवण्यात येत आहे. कारागृहाबाहेरील रस्ता वाहतुकीसाठी बंद करावा अशा मागणीचे पत्र पोलीस आयुक्त कार्यालयाला दिले असल्याची माहिती कारागृहाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
येरवडा कारागृहाबाहेर तुरुंगाधिकाऱ्यांवर गोळीबार करण्याच्या या घटनेमुळे येरवडा कारागृह पोलिसांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.