पुणे : गेल्या अनेक वर्षांपासून गणेशमूर्ती पर्यावरणपूरक असावी, यावर खल सुरू आहे; पण पुण्याचे ग्रामैदवत कसबा गणपती दोन वर्षांपासून संपूर्णपणे पर्यावरणपूरक मिश्रणाने तयार होत आहे. यंदाही कसबा गणपतीची मूर्ती ही याच मिश्रणाने साकारली असून, ती शंभर टक्के पर्यावरणपूरक आहे. त्यात गाळाची माती, शाडूची माहिती आणि भाताचे तूस यांचा समावेश आहे. या मिश्रणाला पेटंट देखील मिळालेले आहे, अशी माहिती प्रसिद्ध शिल्पकार अभिजित धोंडफळे यांनी दिली.
कसबा हे पुणे शहराचे ग्रामदैवत आहे. ज्या गावात आपण राहतो, त्याची सेवा करायला मिळते आहे, ही भावनाच खूप सुखद आहे. गणेशोत्सवानिमित्त ग्रामदैवतच माझ्या स्टुडिओमध्ये येतो. आमच्या येथून कसबा गणपतीची मूर्ती पालखीत बसवली जाते आणि तिथून मिरवणूक मंडपापर्यंत काढली जाते. गेल्या तीन वर्षांपासून कसबा गणपतीच्या मूर्तीचे काम आमच्याकडे आहे.
‘‘आमची तिसरी पिढी शिल्पकलेत कार्यरत आहे. मी २०१६ मध्ये एका स्पर्धेत सहभागी झालो होतो. तेव्हा शंभर टक्के पर्यावरणपूरक मूर्ती कशी करता येईल, यावर विचार सुरू झाला. त्यानंतर खूप प्रयोग केले आणि अखेर गाळाची माती ६० टक्के, शाडूची माती ३० टक्के आणि १० टक्के भाताचे तूस वापरले. याला मागच्या वर्षीपासून पेटंट मिळाले. संपूर्ण इको फ्रेंडली मिश्रण आहे. पेटंटसाठी २०१९ मध्ये फाइल केले होते. ते गेल्यावर्षी मिळाले. या मिश्रणासाठी खूप लॅब टेस्टिंग झाले, त्यातून तावून-सुलाखून मिश्रण तयार झाले आहे. या मिश्रणाने कसबा गणपतीची मूर्ती तयार करायला मिळणे हे भाग्यच आहे, असे धोंडफळे म्हणाले.
‘रवींद्र मिश्रण’ पेटंट
खरंतर त्यासाठी कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे यांचे खूप सहकार्य मिळाले. त्यांच्यामुळे ही मूर्ती करता आली. त्यांना मी या मिश्रणाची माहिती दिली. तेव्हा त्यांनी पाठिंबा दिला आणि मला मूर्ती साकारता आली. या पेटंटला माझे वडील रवींद्र यांचे नाव दिले. ‘रवींद्र मिश्रण’ असे पेटंटचे नाव आहे.
या मिश्रणाची जनजागृती अधिक व्हावी. त्यामुळे पर्यावरणाची हानी होणार नाही. याच मिश्रणाने पंढरपूर देवस्थानला विठ्ठल-रुक्मिणी मूर्ती तयार करून दिली. पुण्याचे दैवत आणि महाराष्ट्राचे दैवत पंढरपूर अशा दोन्ही ठिकाणी माझी मूर्ती आहे. -- अभिजित धोंडफळे, प्रसिद्ध शिल्पकार