चाकण : खराबवाडी ( ता.खेड ) गावच्या हद्दीत जंबुकरवस्तीजवळ बजाज ऑटो कंपनीच्या मोकळया जागेत दोन महिन्यापासून नादुरुस्त अवस्थेत पडलेल्या इस्टिम मोटार कारमध्ये एका पाच वर्षाच्या लहान बालकाचा गुदमरून मृत्यू झाला असल्याची माहिती ठाणे अंमलदार एस.आर. जरे यांनी दिली.हा मृत्यू गुदमरून झाला असला तरी हा अपघात आहे कि घातपात आहे हे अद्याप समजले नाही. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यासाठी शव विच्छेदनानंतर व्हिसेरा राखून ठेवला आहे. दुपारी बारा पासून सायंकाळी साडेपाच पर्यंत भर उन्हात तापलेल्या नादुरुस्त गाडीत बालक अडकल्याने व त्यास बाहेर येता न आल्याने गुदमरून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या वस्तीत बालकाच्या घराशेजारी असणाऱ्या एका किराणा दुकानाच्या सीसी टीव्हीत रस्त्याच्या अलीकडेच फुटेज मिळत असल्याने हा प्रकार कसा घडला हे चित्रित झाले नाही.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हि घटना सोमवार ( दि. २ ) दुपारी १२ ते सायंकाळी पावणेसहाच्या दरम्यान घडली. करण अखिलेश पांडे ( वय ५, रा.जंबुकर वस्ती, खराबवाडी ) असे मृत मुलाचे नाव आहे. याबाबतची खबर अखिलेश सियाराम पांडे ( वय ३५, रा. जंबुकर वस्ती, सुधीर खेडेकर यांची खोली, खराबवाडी, चाकण, ता.खेड, जि.पुणे, मूळ रा. ताजपूर, पो.ता. सकलडीया, जि. वदोवली, उत्तरप्रदेश ) यांनी चाकण पोलीस ठाण्यात दिली आहे. करणचे वडील एका खासगी कंपनीत कामाला आहेत.याबाबतची अधिक माहिती अशी कि, खराबवाडी येथील जंबुकर वस्तीवर मागील काही महिन्यांपासून एक नादुरुस्त कार वस्ती लगतच्या एमआयडीसी हद्दीत बजाज ऑटो च्या मोकळ्या जागेत पार्किंग केलेली आहे. मृत करणची आई सुशीलादेवी हि आपल्या लहान बाळाला पोलिओ लसीकरणाचा डोस देण्यासाठी दवाखान्यात गेली होती. यावेळी करण हा इतर मुलांसोबत खेळत होता. दुपारी दोन वाजता आई घरी अली असता मुलगा करण कुठे दिसला नाही. म्हणून त्याचा सगळीकडे शोध घेतला. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास आई सुशीलादेवी व वस्तीवरील इतर लोक शोध घेताना मुलगा करण हा उभ्या असलेल्या नादुरुस्त ईस्टीम कार क्रमांक ( एमएच १२ डब्ल्यू ८४४७ ) मधील पाठीमागील सीटवरील पडलेला आढळून आला. पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सुभाष पवार व हवालदार साळुंके पुढील तपास करीत आहेत.
पुण्यात पाच वर्षाच्या बालकाचा कारमध्ये गुदमरून मृत्यू, दोन महिन्यापासून पडून होती गाडी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2018 6:04 PM