पुणे : पुणे शहराला सोमवारी रात्री अचानक पावसाने चांगलेच झोडपून काढले. खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांसह, पेठांमधील दुकानदार, हाॅकर्स यांच्यासह स्थानिकांचे हाल झाले. यात अनेकांच्या गाड्या बंद पडल्या. त्यामुळे लहान लेकरांना साेबत घेऊन आलेल्या कुटुंबांची चांगलीच तारांबळ उडाली हाेती. त्यातच विजांचा कडकडाट झाल्याने मुले घाबरत हाेती. अनेक जण जीव मुठीत घेऊन आडाेसा शाेधत हाेते. या पावसाने रस्त्यांवर पुन्हा पाणीच पाणी झाले. त्यामुळे वाहतूक कोंडीही झाली. दिवाळी खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांचे हाल झाले. अक्षरशः पुणेकरांची दाणादाण झाली. पण यामध्येही राजकीय पक्षांनी राजकारण आणले आहे. पुण्यात भाजप आणि राष्ट्रवादीचे नेते उपाय काढायचे सोडून एकमेकांवर आरोप करताना दिसून आले आहेत.
ढगफुटीसदृश्य पावसाने पुण्यात हाहाकार उडवून दिला. संपूर्ण शहराची तुंबई झाली. या पार्श्वभूमीवर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राजकीय आरोप- प्रत्यारोप सुरू झाले आहेत. नव्या पुण्याच्या शिल्पकारांनी ‘पुण्याचा केलेला विकास पुण्याच्या रस्त्यावरून वाहतोय’, अशा शब्दात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी टीका केल्यावर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुणे शहर तुंबण्यासाठी राष्ट्रवादीच जबाबदार असल्याचे म्हटले आहे.
पुण्यासारख्या जागतिक पातळीवर महत्त्वाच्या असणाऱ्या शहरात असे चित्र निर्माण होणे, हे अत्यंत दुर्दैवी आहे. शहरात अक्षरशः रस्त्यांच्या नद्या बनलेल्या आहेत. गेली २४ तास नागरिकांना प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. गेली पाच वर्षे पुणे महापालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे, असे जयंत पाटील यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
पुण्याला नद्यांचे स्वरूप आले आहे. वाहतुकीबाबत कुणाचे लक्ष नाही. वाहतूककोंडीबाबत पोलिसांना विश्वासात घेण्याची गरज आहे. पुण्याला पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. याकडे लक्ष द्यायला हवे. ते लक्ष दिले जात नाही, असा आरोपही अजित पवार यांनी केला.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, विरोधकांना टीका करायचीच असते. त्याबद्दल मला वेगळे काही म्हणायचे नाही. जयंतरावांना यापेक्षा वेगळे काय म्हणायचे असते?अजित पवार यांच्या टिकेला उत्तर देताना पाटील म्हणाले की, गेल्या अडीच वर्षांत तुमचे सरकार होते. पुण्यात भाजपची सत्ता होती, तरी पालकमंत्री म्हणून तुम्ही कसा काटा लावलेला, कसा हूक लावलेला याची बरीच उदाहरणे आहेत. पालकमंत्री म्हणून तुम्ही महापालिकेला आदेश देऊन खूप गोष्टी करून घ्यायला हव्या होत्या. त्या का नाही करून घेतल्या? सत्ता आमची असली तरी पालकमंत्र्यांना अधिकार असतात, असे म्हणत चंद्रकांत पाटलांनी अप्रत्यक्षपणे पुण्यातील पाणी तुंबण्यावरून माजी पालकमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर टीका केली.