मंचर (पुणे) : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मागील पाच दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन करणारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख दत्ता गांजाळे यांच्या आंदोलनाची दखल प्रशासनाने घेतली नाही. त्यामुळे त्यांनी चक्क आज चांडोली येथे बिबट्याला पकडण्यासाठी लावलेल्या पिंजऱ्यात बसून अन्नत्याग आंदोलन सुरू केले. त्यानंतर प्रशासनाची धावपळ उडाली. तहसीलदार, वन विभागाचे अधिकारी यांनी शेतावर जाऊन दत्ता गांजाळे यांच्या मागण्या समजावून घेत आश्वासन दिले. त्यानंतर त्यांनी अन्नत्याग आंदोलन मागे घेतले.
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख दत्ता गांजाळे यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते. त्यासाठी मंचर शहराच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात मंडप टाकून मागील पाच दिवस त्यांचे आंदोलन सुरू होते. अनेक संघटनांनी त्यांना पाठिंबा दिला; मात्र प्रशासनाने त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे गांजाळे यांनी आज अभिनव आंदोलन केले. चांडोली बुद्रुक गावच्या हद्दीतील बेलदत्तवाडी येथील संतोष बाजीराव थोरात यांच्या उसाच्या शेतालगत पंधरा दिवसांपूर्वी बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात आला आहे.
आज सकाळी दत्ता गांजाळे यांनी पिंजऱ्यात बसून अन्नत्याग आंदोलन सुरू केले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी मी लढा देत आहे. बिबट्याने मला खाल्ले तरी काही हरकत नाही; मात्र आंदोलन सुरू ठेवणार असल्याचा निर्धार त्यांनी केला. प्रशासनाला ही माहिती समजताच तहसीलदार संजय नागटिळक, वनपरिक्षेत्राधिकारी स्मिता राजहंस, जलसंपदा विभागाचे दत्ता कोकणे, पोलिस कर्मचारी यांनी पिंजरा ठेवलेल्या ठिकाणी धाव घेतली. यावेळी प्रशासनाच्या वतीने गांजाळे यांच्याशी चर्चा करण्यात आली. त्यांच्या मागण्या समजावून घेण्यात आल्या व शासन दरबारी पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन दिल्यानंतर तहसीलदार संजय नागटिळक यांच्या हातून नारळ पाणी पीत दत्ता गांजाळे यांनी अन्नत्याग आंदोलन समाप्त केले.
याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख सुरेश भोर, मंचर शहराध्यक्ष विकास जाधव, ज्येष्ठ नेते अरुण नाना बाणखेले, रंगनाथ थोरात, वनपाल शशिकांत मडके आदी उपस्थित होते. आगामी काळात मागण्या मान्य झाल्या नाहीत तर पुन्हा अन्नत्याग आंदोलन करण्याचा इशारा गांजाळे यांनी दिला आहे.
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान मिळावे, जलसंपदा विभागाने वाढीव पाणीपट्टी वसूल करू नये, बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पशुधनाची नुकसान भरपाई मिळावी, बिबट प्रवण क्षेत्रात दिवसा वीज द्यावी तसेच पिंजऱ्यांची संख्या वाढवून प्रत्येक गावात जनजागृती करावी. वीज बिल माफी मिळावी. मोजणीची कामे तसेच तहसील कार्यालयातील कामे जलदगतीने व्हावीत आदी विविध मागण्यांसाठी दत्ता गांजाळे यांनी हे अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते. चांडोली येथील बेलदत्तवाडीत संतोष थोरात यांच्या शेतालगत चार ते पाच बिबटे व दोन पिल्ले यांचा वावर असल्याने पंधरा दिवसांपूर्वी पिंजरा लावला होता. अन्नत्याग आंदोलन करण्यासाठी हेच ठिकाण गांजाळे यांनी निवडले.