पुणे : पोलीस आयुक्तांनी वारंवार तंबी देऊनही शहरातील अवैध धंदे काही थांबताना दिसत नाहीत. पुण्यातील समर्थ पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका शाळेलगत असणाऱ्या जुगाराच्या अड्ड्यावर गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला. यावेळी 5 रायटरसह 13 जणांना ताब्यात घेण्यात आले. विद्येचे माहेरघरातच एका शाळेच्या भिंतीलगतच जुगार अड्डा सुरू असल्याने पुन्हा एकदा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. समर्थ पोलीस ठाण्यात याप्रकरणी महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम कलम १२ (अ),४(अ), ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईत गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रायटर सुभाष महादेव धनवटे (वय ६३), सादिक पापामिया तांबोळी (वय ६२), सोमेश्वर प्रभाकर गायकवाड (वय ५४), विजय शंकर बडदे (वय ४०), राजेंद्र धोंडिबा बनसोडे (वय ५५) यांच्यासह खेळणाऱ्या गजानन सुग्रीव लोमटे (वय ३०), विक्रम अशोक बनकर (वय ३१), सलिम महंमद उस्मान मनसुरी (वय ४०), रमेश व्यंकट कुंडकर (वय ५७), विलास गोपाल तापकीर (वय ६३), अजित जनार्धन जाधव (वय ४५), संजय कांतीलाल बोरा (वय ५२), रतिकांत लक्ष्मण सोनवणे (वय ५०) यांना पकडण्यात आले आहे.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी शहरातील अवैध धंदे बंद करण्याच्या सूचना यापूर्वी अनेकदा दिल्या होत्या. यापूर्वी ज्या पोलिस स्टेशनच्या हद्दीत अशा प्रकारे अवैध धंदे सुरू असल्याचे निदर्शनास आले आले होते त्यावेळी संबंधित पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई देखील करण्यात आली होती. मात्र त्यानंतरही शहरातील अनेक पोलिस स्टेशनच्या हद्दीत अवैध प्रकार सुरू असल्याचे दिसत आहे. दरम्यान समर्थ पोलीस स्टेशनच्या हद्दीत, पोलीस स्टेशन पासून काही अंतरावर आणि एका शाळेच्या सीमाभिंती लगतच कल्याण नावाचा जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या सामाजिक विभागाला समजली होती. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून कारवाई केली. त्यावेळी येथे ८४ हजार ३८० रोकड मोबाईल असाए एकूण सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जुगार अड्डा आप्पा कुंभार याचा असल्याचे पोलीसांकडून सांगण्यात आले असून, तो फरार आहे. त्याचा शोध घेतला जात आहे.