पुणे : शतकोत्तर रौप्यमहोत्सवाचे औचित्य साधून महापालिकेने यंदाचा सार्वजनिक गणेशोत्सव अविस्मरणीय करण्यात पुढाकार घेतला आहे. पाच हजार विद्यार्थ्यांनी एकाच वेळी गणेशमूर्ती तयार करणे तसेच काही हजार युवकांचे ढोल-ताशावादन यातून जागतिक विक्रम करण्यात येणार असून त्याची नोंद गिनीज बुकात व्हावी, यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.महापौर मुक्ता टिळक यांनी महापालिकेने आयोजिलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, आयुक्त कुणाल कुमार हेही या वेळी उपस्थित होते. महापौर म्हणाल्या, की सोशल मीडियाचा वापर, खास गणेशोत्सवाचा म्हणून एक शुभंकर, विशेष असे संकेतस्थळ, एवढेच नाही तर फक्त गणेशोत्सवासाठी म्हणून एक मोबाईल अॅप्लिकेशनही तयार करण्यात येत आहे. या सर्व माध्यमातून यंदाच्या गणेशोत्सवाची पताका जगभरात फडकावी, असा प्रयत्न आहे.१२५ कलाकारांना या काळात पुण्यात निमंत्रित करण्यात येणार आहे. एक उंच ध्वजा शहरात उत्सवकाळात कायम फडकत असेल, देशभरातील विविध १२५ गायकांना एकत्र करून गणेशवंदना सादर करण्याचाही प्रयत्न सुरू आहे. या सर्व मार्गांनी गणेशोत्सव अविस्मरणीय करण्यात येईल.उत्सवाच्या सुरुवातीपासूनची म्हणजे थेट १२५ वर्षे असलेली अनेक सार्वजनिक मंडळे आहेत. त्यांनी तसेच अन्य मंडळांनाही, नागरिकांनी त्यांच्याजवळ असलेली गणेशोत्सवाची जुनी छायाचित्रे महापालिकेकडे द्यावीत, त्यांचे श्रमिक पत्रकार संघाच्या साह्याने प्रदर्शन आयोजिण्यात येणार आहे, असे महापौरांनी सांगितले. महापालिकेची देखावा स्पर्धा यापूर्वी फक्त मंडळांसाठीच होती. याही वेळी ती असेल, मात्र यंदा सोसायट्यांच्या गणपतींसाठीही वेगळी स्पर्धाठेवण्यात आली आहे. गणेशोत्सवाच्या किमान महिनाभर आधी सर्व कार्यक्रम सुरू करण्यात येणार आहेत, असे महापौरांनी सांगितले.उत्सवकाळात शहरात अनेक ठिकाणी सेल्फी स्पॉट सुरू करण्यात येतील. त्याशिवाय स्नॅप चॅटही असेल. फेसबुक, टिष्ट्वटर, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप, वेबसाईट या सर्व माध्यमांमध्ये पुण्याचा गणेशोत्सव उत्सवकाळात चर्चेत राहील, यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत, असे पदाधिकाºयांनी सांगितले. त्यासाठी त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञांची मदत घेण्यात येत आहे. महापालिकेने यासाठी २ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून त्याशिवाय अनेक जण महापालिकेला मदत करणार असल्याचेही या वेळी सांगण्यात आले.
यंदाचा गणेशोत्सव होणार अविस्मरणीय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2017 7:38 AM