पुणे : कोरोनाचा संसर्ग कमी झाला असला तरी तो पूर्णपणे संपलेला नाही. त्यात तिसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त करण्यात येत असल्याने गणेशोत्सवात अधिक काळजी घेण्याची गरज आहे. त्यामुळे गतवर्षीप्रमाणे यंदाही गणरायाची प्राणप्रतिष्ठापना मंदिरात करावी. तसेच भाविकांना ऑनलाईन दर्शनाची सोय उपलब्ध करुन द्यावी, असे आवाहन शहर पोलीस दलाच्या वतीने करण्यात आले. त्याला मानाच्या गणेश मंडळांनी पोलिसांना संपूर्ण सहकार्याची भूमिका दर्शविली असून आचारसंहितेप्रमाणे यंदाही गणेशोत्सव साजरा केला जाईल, असे आश्वासन दिले.
शहर पोलीस आणि मानाच्या गणेश मंडळांच्या पदाधिकार्यांची अनौपचारिक बैठक प्रथेप्रमाणे आज सायंकाळी पोलीस आयुक्तालयात झाली. त्या पहिले मानाचे पाच गणपती मंडळे व शेवटचे मानाच्या गणेश मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी पोलिसांनी राज्य शासनाने यंदा तयार केलेल्या मार्गदर्शक सूचनांची माहिती पदाधिकार्यांना देण्यात आली. तसेच पोलीस आणि गणेश मंडळ यांनी गतवर्षीप्रमाणे आचारसंहिता तयार करावी, असे या बैठकीत ठरविण्यात आले. गतवर्षीप्रमाणे यंदाही मंदिरात गणेशोत्सव साजरा केला जाईल, असे श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती मंडळ, अखिल मंडई गणपती मंडळाच्या वतीने यावेळी सांगण्यात आले. ज्या मंडळांचे मंदिर आहे. त्यांनी मंदिरात गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
दरवर्षीप्रमाणे मानाच्या गणेश मंडळांच्या पदाधिकार्यांसमवेत अनौपचारिक बैठक घेण्यात आली. सौहार्दपूर्ण वातावरणात ही बैठक झाली असून गतवर्षीप्रमाणे पोलिसांना सहकार्य करण्याचे आश्वासन मंडळांच्या पदाधिकार्यांनी दिली आहे.डॉ. रवींद्र शिसवे, सह पोलीस आयुक्त, पुणे