पुणे : गणेश विसर्जन मिरवणुकीत रंगावलीचे कायम आकर्षण असते. यंदा ‘घातक विळख्यात तरुणाई’ या ज्वलंत विषयावर आधारित रांगोळीच्या पायघड्या काढण्यात आल्या. त्याद्वारे ड्रग्जपासून ते ऑनलाइन गेमिंगमध्ये अडकलेल्या तरुणाईला त्यातून दूर जाण्याविषयीचा महत्त्वपूर्ण संदेश दिला गेला. ८ वर्षांच्या लहान मुलांपासून ते ८० वर्षांच्या ज्येष्ठांपर्यंत या वयोगटातील रंगावलीकार एकत्र येत मिरवणुकीत अकरा चौकात रांगोळींच्या पायघड्या काढण्यात आल्या.
गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रीय कला अकादमीतर्फे महात्मा फुले मंडई येथील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यापासून ते टिळक चौकापर्यंत रांगोळी काढण्यात आली. सकाळपासून रंगावलीच्या पायघड्या काढण्यास सुरुवात केली. यंदा घातक विळख्यात तरुणाई या विषयावर टिळक चौकात शंभर फुटाची रांगोळी काढण्यात आली. तर सर्व चौकात गालिचा रांगोळी काढण्यात आली. त्यासाठी अंदाजे चौदाशे किलो रांगोळीचा वापर करण्यात आला. प्रत्येक चौकात रांगोळी काढली गेली.. संपूर्ण विसर्जन मिरवणूक मार्गावर पायघड्याही काढण्यात आला.
अकादमीचे सदस्य अमर लांडे म्हणाले, रंगावलीकार गेल्या दोन महिन्यांपासून तयारी करत आहेत. सकाळी ७ वाजता कलाकारांकडून रांगोळी काढण्यास सुरुवात झाली. नऊ चौकांमध्ये २५ फुटी, तर टिळक चौकात शंभर फुटी रांगोळी काढण्यात आली. ३५० ते ४०० रंगावलीकार यांनी काढलेल्या चित्ररांगोळींतून जागृती करण्यात आली.