पुणे : ‘‘पुण्याच्या घनकचरा व्यवस्थापनाचे व विकेंद्रीकरण पध्दतीचे कौतुक असून ‘स्वच्छ’ची कचरा संकलन सेवा, कचरावेचकांच्या व असंघटित क्षेत्राचा समावेश, कचऱ्याचे वर्गीकरण, रिसायकलिंग, मनपाचे ओला कचरा जिरविण्याचे विविध विकेंद्रित प्रकल्प व जिथे निर्माण होतो तिथेच कचरा जिरवा हे धोरण आदर्श असून विविध दक्षिणपंथी देश (ब्राझील, इंडोनेशिया, फिलीपिन्स, साऊथ आफ्रिका इ.) या मॉडेलकडे प्रेरणा म्हणून पाहत आहेत. तुमचे हे मॉडेल्स चालू ठेवा,’’ असे मत आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञ आणि विज्ञान व धोरण संचालक डॉ. नील टॅन्ग्री यांनी व्यक्त केले. महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभाग आणि स्वच्छ सेवा सहकारी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या अभियांत्रिकी व प्रशासकीय कर्मचाºयांसाठी ‘स्टेनेबल वेस्ट प्रोसेससिंग’ विषयावर कार्यक्षमता वाढ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख तथा सह महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर मोळक यांच्या हस्ते या कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यशाळेमध्ये समूचित एनव्हिरो टेक आणि एआरटीआयच्या डॉ. प्रियदर्शनी कर्वे यांनी कर्मचाºयांसोबत कचरा व्यवस्थापनाविषयी चर्चा केली. यावेळी स्वच्छ संस्थेचे हर्षद बर्डे यांनी महापालिका-स्वच्छचे कचरा संकलन मॉडेल, असंघटित क्षेत्रामार्फत होणारे रिसायकलिंग, आटीसी कंपनीच्या मदतीने होणारे एम.एल.पी. (मल्टीलेय प्लास्टीक) रिसायकलिंग व एचडीपीई टू थ्री डी प्रिंटर फिलामेंट या विविध यशस्वी प्रकल्पांबाबत सादरीकरण केले. संकेत जाधव, कनिष्ठ अभियंता, यांनी महानगरपालिकेच्या ओला व सुका कचºयाच्या विविध प्रकल्पांबाबत तसेच महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापनात करीत असलेल्या कामांचे सादरीकरण केले. मोळक म्हणाले, मिशन २०२० व व्हिजन शून्य ते शंभर हे पूर्ण करण्याबरोबरच पुणे शहर अनेक शहरांच्या पुढे आहे. असे असले तरी पालिका नवीन पद्धती शिकणे आणि प्रयोग करण्यास सदैव आघाडीवर राहील असे स्पष्ट केले. यावेळी डॉ. कर्वे, यार्दीच्या सीएसआर प्रमुख भारती कोठावले, अविनाश मधाळे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मोळक यांनी केले. तर आरोग्य अधिकारी डॉ. केतकी घाटगे यांनी आभर मानले.
पुण्याचे कचरा संकलन मॉडेल दक्षिणपंथी देशांसाठी मार्गदर्शक : डॉ. नील टॅन्ग्री
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2020 5:35 PM
पुण्याच्या घनकचरा व्यवस्थापनाचे व विकेंद्रीकरण पध्दतीचे कौतुक
ठळक मुद्देकचरा व्यवस्थापन-प्रक्रियेबाबत कार्यशाळा