यवत : पुणे शहराची ‘कचराकोंडी’ अद्यापही सुटली नसल्याने महापालिका आता हा कचरा शेतकऱ्यांना देत आहे. जिल्ह्यातील तब्बल ३00 शेतकरी हा करचा घेत आहेत. मात्र, तो गाडला जात नसल्याने त्या परिसरातील आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर येत आहे. दौैंड तालुक्यातील प्रतिपंढरपूर समजल्या जाणाऱ्या विठ्ठल बन डाळिंब येथील लालवाडी परिसरात हा कचरा टाकला जात आहे. मात्र, येथे दुर्गंधी व माश्यांच्या उपद्रवामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. विठ्ठलभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या डाळिंबमध्ये कचरा टाकला जात असताना स्थानिक ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी विरोध करूनदेखील कचरा टाकणे सुरूच होते. आषाढी एकादशी असल्याने तात्पुरत्या स्वरूपात दोन दिवस कचऱ्याच्या गाड्या बंद असल्याचे सरपंच मंगल सुतार यांनी सांगितले. डाळिंब ग्रामपंचायत प्रशासन परिसरात कचरा टाकण्याच्या विरोधात आहे. परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत महानगरपालिका व आरोग्य विभागाशी आम्ही पत्रव्यवहार करणार असल्याचे देखील सरपंच मंगल सुतार यांनी सांगितले. प्रचंड दुर्गंधी येत असलेला ओला कचरा डाळिंब परिसरात टाकण्यात सुरुवात झाली आहे. अचानक खासगी मालकी असलेल्या एका माळरानात हा कचरा टाकण्यात आला आहे. यासाठी ग्रामपंचायतीची कसलीही परवानगी घेण्यात आलेली नाही. दुर्गंधीमुळे आजूबाजूच्या शेतकऱ्यांना शेती करणे कठीण बनले आहे. तरकारीची शेती आहे तशीच सोडून देण्याची वेळ काही शेतकऱ्यांवर आली आहे. मात्र, मागील काही दिवसांत कचरा तसाच पडून आहे. खासगी मालकी असलेल्या माळरानात कचरा टाकला जात असला तरी याचा त्रास अनेक सर्वसामान्य शेतकरी व नागरिकांना होत आहे. हा कचरा उचलून कचरा टाकणे बंद न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा परिसरातील ग्रामस्थांनी ‘लोकमत’शी बोलताना दिला आहे. (वार्ताहर)मुळात शहरातील कचरा ग्रामीण भागात टाकू नये, अशी आमची ठाम भूमिका आहे. त्यानी त्यांचा कचरा शहरातच जिरवावा. विनाकारण ग्रामीण भागातील जनतेला त्रास देव नये. फक्त ओला कचरा टाकणार असे महापालिकेने सांगितले होते. या कचाऱ्यामुळे जर ग्रामस्थांना त्रास होत असेल तर तसा जाब महापालिकेला विचारू.- प्रदीप कंद , अध्यक्ष, जिल्हा परिषद
पुण्याचा कचरा ग्रामीण भागात
By admin | Published: July 28, 2015 12:38 AM