पुणे : दोन दिवसांपासून शहरातील तापमानाचा पारा उतरल्याने पुणेकरांना हुडहुडी भरली आहे. मंगळवारी (दि. २२) ८.१ अंश सेल्सिअस इतक्या यंदाच्या निचांकी तापमानाची नोंद झाली.
शहरात गुलाबी थंडीची चाहूल लागली असून, दिवसभर हवेत गारवा जाणवत आहे. स्वेटर, मफलर, कानटोप्या परिधान करूनच पुणेकरांना घराबाहेर पडावे लागत आहे. रात्रीच्या वेळेस बोचऱ्या थंडीचा अनुभव मिळत आहे. त्यामुळे थंडीच्या बचावासाठी रस्त्याच्या कडेला शेकोट्या पेटविल्या जाऊ लागल्या आहेत. गेल्या दोन दिवसांपासून तापमानाचा पारा घसरण्यास सुरूवात झाली आहे. सोमवारी (दि.२१) किमान तापमान ९ अंश सेल्सिअस होते. एकाच दिवसात पाऱ्यात १ अंश सेल्सिअसने घट झाल्याचे पाहायला मिळाले. पुढील दोन दिवस तरी थंडी कायम राहाणार असल्याचे वेधशाळेकडून सांगण्यात आले आहे.