पुणे : सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी अनेकदा सोशल मीडिया युजर्सकडून जीवघेणा स्टंट केला जात असल्याचे दिसून आले आहे. असाच एक जीवघेणा स्टंट करणारा व्हिडिओ पुण्यातील तरुणी माधवी कुंभारने सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडिओ सोशलवर प्रचंड व्हायरल झाला आहे.
सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी धोकादायक स्टंट करणाऱ्या माधवी कुंभारने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या रीलमध्ये बुलेटवर उभे राहून स्टंटबाजी केली आहे. तर यापूर्वी तिने बसच्या पुढे गाडी चालवत स्टंट केला आहे.
इंस्टाग्रामवर तिने जीवघेणा स्टंट केल्याचे रील चांगलेच चर्चेत आले आहे. तिच्या या रिलवर पोलीस कारवाई करणार का असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. या रीलने सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर चर्चेला उधाण आलं आहे.मिळालेल्या माहितीनुसार, माधवीने यापूर्वीही अशा प्रकारचे स्टंट केले होते. त्यावेळी पोलिसांनी तिला बोलावून समज दिली होती. मात्र, तिच्या वागणुकीत कोणताही बदल झालेला दिसत नसल्याचे नुकत्याच केलेल्या रील मधून दिसून येत आहे. सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी असे स्टंट करताना तिच्या कृतीमुळे सार्वजनिक सुरक्षा धोक्यात येऊ शकते. तिच्या स्टंटबाजीमुळे तरुण पिढीवरही चुकीचा परिणाम होण्याची शक्यता आहे.दरम्यान, पोलिसांकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही, पण यावेळी कठोर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळवण्यासाठी जीव धोक्यात घालणाऱ्या कृतींवर पोलिसांनी नियंत्रण आणणे आवश्यक असल्याची प्रतिक्रियाही आता सोशल चर्चेत आली आहे.