पुणे : पुण्यातील एका प्रसिद्ध सराफी व्यावसायिकाला त्यांच्या ग्रृपमधील एका कंपनीने डी.एच.एल.एफ यांच्याकडून घेतलेल्या ६८ कोटी रूपयांच्या कर्ज प्रकरणात घोटाळा झाला आहे. त्यावर आयकर विभागाने आक्षेप घेत, ईडी वएस.एफ.आय.ओ यांनी त्रुटी काढल्या आहेत असा बनाव रचत हे प्रकरण मिटविण्यासाठी व्यावसायिकाकडे ५० लाख रूपयांची खंडणी मागणा-याला युनिटच्या 1 च्या गुन्हे शाखेने अटक केली.
रूपेश ज्ञानोबा चौधरी (वय 46 रा.फ्लँट नं बी/303, तुळशीबाग कॉलनी, सहकारनगर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. यापूर्वी त्याच्यावर दत्तवाडी पोलीस स्टेशन येथे खंडणीचा गुन्हा दाखल आहे. तक्रारदार हे सराफी व्यावसायिक आहेत.
त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चौधरीसह अमित मिरचंदाणी (रा.शनिवार पेठ), विकास रूपलाल भल्ला (रा.क्लाऊड 9 सोसायटी, एनआयबीएम रोड, कोंढवा), संतोष राठोड (रा.पॉप्युलर हाईटस, शाहू चौक) यांच्याविरूद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. हा प्रकार 22 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजता शनिवार पेठेतील अमीर मिरचंदाणी यांच्या कार्यालयात घडला.
आरोपींनी आपापसात संगनमत करून डी.एच.एल.एफ यांच्याकडून घेतलेल्या ६८ कोटी रूपयांच्या कर्ज प्रकरणात घोटाळा झाला आहे. आयकर विभागाने आक्षेप घेत, ईडी व एस.एफ.आय.ओ यांनी त्रुटी काढल्या आहेत असा बनाव रचला आणि आरोपी विकास भल्लाने तक्रारदारांना ईडीचे दिल्लीतील अधिकारी माझ्या ओळ्खीचे आहेत.
ते पुण्यात आले आहेत. तुमची केस त्यांच्याकडे प्रलंबित आहे. हे प्रकरण मिटवून देतो असे सांगितले. दरम्यान, आरोपी रूपेश चौधरी याने माझ्याकडे २०० लोकांची टिम आहे. मी तक्रारदार यांना सोडनार नाही. बघून घेईन अशी धमकी देत त्या सर्वांनी पूर्वनियोजित कट करून आयकर प्रकरण मिटवण्यासाठी फिर्यादीकडे ५० लाखांची मागणी केली. या गुन्हयाचा तपास करीत असताना रूपेश चौधरी हा त्याच्या घरी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. शुक्रवारी (दि.8) पहाटेच्या वेळी सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याला न्यायालयात हजर केले असता दि. ११ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आरोपी अमित मिरचंदाणी, विकास भल्ला, संतोष राठोड व इतर आरोपींचा शोध सुरू आहे.