पुणे : महापालिका सभागृहाची मुदत संपल्यामुळे पुण्याचे महापौर पद रिक्त असल्याने, यंदाच्या वर्षी महापालिका आयुक्त तथा प्रशासक विक्रम कुमार यांच्या हस्ते गणेश विसर्जन मिरवणुकीची सुरुवात होणार आहे. शुक्रवारी सकाळी ९.३० वाजता महात्मा फुले मंडईतील लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुतळ्यास तसेच लोकनेते यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यात कुमार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे. त्यानंतर विसर्जन मिरवणूकीस सकाळी १० वाजता प्रारंभ होईल.
महापालिकेच्या वतीने अलका टॉकीज चौकात स्वागत मंडप उभारण्यात आला असून, विसर्जन मिरवणूकीत सहभागी झालेल्या मंडळांच्या अध्यक्षांना व पदाधिकान्यांना मनपा अधिकारी तसेच खातेप्रमुख यांच्या हस्ते श्रीफळ देऊन सन्मानित केले जाणार आहे. यंदाचे वर्षी गणेशोत्सव विसर्जनाकरिता पुणे महापालिकेच्यावतीने सर्व स्तरावर आवश्यक पूर्ण तयारी करण्यात आलेली आहे. गणेशोत्सवाच्या तयारीच्या दृष्टीने १५ क्षेत्रिय कार्यालयांनी त्यांच्या परिसरातील सार्वजनिक स्वच्छता, मिरवणूक मार्गावर स्वच्छता व औषधोपचाराची व्यवस्था, ग्रुप स्विपिंग, कटेनर, निर्माल्य कलश, किटकनाशक फवारणी विसर्जन घाटांवरमल कर्मचारी व्यवस्थापन, घाटांवर औषध फवारणी, नदी किनारच्या विसर्जन घाटांवर तसेच ज्या भागात नदी, तलाव, विहीरी माहीत अशा परिसरात विसर्जन हौद, लोखंडी यांची सोय करण्यात आलेली आहे. त्याच बरोबर जीवरक्षकांच्या नियुक्त्या, सुरक्षा यंत्रणा, विद्युत जनित्र, ध्वनिक्षेपक यंत्रणा, जलवाहिनी व मलवाहिन्या यांच्या गळतीच्या ठिकाणी त्वरीत दुरुस्ती कामे करण्याकरिता स्वतंत्र कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करणेत आलेल्या आहेत. तर आवश्यकतेनुसार मंडप, बेरिकेटस उभारण्यात आले आहेत. अलका टॉकीज चौक, महाराष्ट्र साहित्य परिषद, टिळक रोड, नारायण पेठ माती गणपतीजवळ मंडप व स्टेज टाकण्यात आले आहेत. ध्वनीक्षेपनाची व प्रकाशाची व्यवस्था करणेत आली आहे. सार्वजनिक स्वच्छतागृहे, शौचालयांची स्वच्छता, फिरती शौचालये, सुचना फलक आदी स्तरावरून तयारी करण्यात आली असल्याची माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली.