पुणे: लसीकरणावरून पुणे एवढं पुढे कस काय? असा प्रश्न सगळे मला विचारत होते. यावर मी त्यांना म्हटले की, सुरुवातीलाच पुण्याने पुढाकार घेतला. बाकी कोणी लसीकरण करतच नव्हते. अनेक जिल्ह्यात तर स्टाफ ही लसीकरणासाठी पुढे येत नव्हता. सर्वच घाबरून नको म्हणत होते. व्हीआयपी लोकांनी लस घेतल्यावर इतर ठिकाणी सुरवात झाली. पुण्यात हे आधीपासूनच सुरु झाल्याने आता ते महाराष्ट्रात अव्व्ल स्थानावर पोहोचत आहे. असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.
बाणेर येथील कोविड सेंटरची पाहणी करण्यासाठी ते आज सकाळी आले होते. पुणे शहरातील करोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता असल्याने, त्या पार्श्वभूमीवर शहरात महापालिकेच्या माध्यमातून बाणेर परिसरात पाच मजली कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. त्या सेंटरची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे सकाळी सातच्या सुमारास आले होते. त्यापूर्वीच प्रशासनाने सर्व तयारी केली होती. यावेळी महापालिका आयुक्त विक्रम कुमार, नगर अभियंता प्रशांत वाघमारे, आरोग्य प्रमुख आशिष भारती आणि स्थानिक नगरसेवक बाबुराव चांदेरे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
पुण्यात आढळणाऱ्या करोनाबाधितांमध्ये नेमके पुण्यातील व बाहेरची किती?
बाणेर येथील कोविड सेंटरची पाहणी केल्यावर महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी शहरातील कोरोना रुग्णांचा आढावा सांगण्यास सुरुवात केली. त्यावर अजित पवार म्हणाले की, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नगर आणि रायगड या जिल्ह्यात दुर्देवाने रुग्णांची संख्या वाढत आहे. सर्व बाबींचा विचार करता. आपल्या पुण्यात जे बाधित रुग्ण आढळतात. त्यातील नेमके पुण्यातील आणि बाहेरचे किती हे पाहण्याची गरज आहे. त्यावरून आपल्याला अंदाज येईल की आपल्या येथील रुग्ण किती आहे. अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.