लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : दक्षिण मध्य महाराष्ट्र ते तमिळनाडू दरम्यान निर्माण झालेल्या चक्रीय चक्रवाताचा परिणाम आज पुण्यासह मध्य महाराष्ट्रात दिसून आला. अनेक ठिकाणी सायंकाळच्या वेळी पावसाने हजेरी लावली. पुण्यात सुमारे तासभर कोसळलेल्या अवकाळी पाऊसाने रस्त्यांना ओढ्याचे स्वरुप आले. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत तब्बल २६.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. ही गेल्या १० वर्षातील सर्वात मोठा दुसर्या क्रमांकाचा मे महिन्यातील पावसाची नोंद आहे. यापूर्वी १४ मे २०१५ रोजी २४ तासात १०२.८ मिमी पावसाची नोंद झाली असून ही आतापर्यंत मे महिन्यातील सर्वाधिक पावसाची नोंद ठरली होती. त्यानंतर आज मोठा पाऊस झाला आहे. लोहगाव येथे ३.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
राज्यात कोल्हापूर ३, नाशिक ०.२, सातारा १०, बुलढाणा ७ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
गेल्या काही दिवसापासून शहरात सलग पाऊस पडत आहे़ पण त्याचे प्रमाण खूपच कमी होते. रविवारी सकाळपासून आकाश ढगाळ होते़ दुपारनंतर आकाश ढगांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली. त्यानंतर साडेतीन वाजण्याच्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झाली. शहराच्या सर्वच भागात पावसाचा जोर दिसून आला. शहराच्या मध्य व पश्चिम भागात पावसाचा अधिक जोर होता. पूर्व भागात त्यामानाने जोर कमी होता. वडगाव शेरी, नगर रोड, गोखलेनगर, शिवाजीनगर परिसरात पावसाचा जोर दिसून आला. या पावसाचा जोर इतका होता की, काही वेळातच रस्त्यावरुन पाण्याचे लोंढे वाहू लागले. लॉकडाऊनमुळे रस्त्यावर वाहतूक नसल्याने कोणाची तशी अडचण झाली नाही.
५ ठिकाणी झाडपडी
या पावसाबरोबरच वार्याचा जोर असल्याने शहरात ५ ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या. त्यात सेनापती बापट रोडवर २ ठिकाणी, कल्याणीनगर, कर्वेनगर, मॉडेल कॉलनीत झाडपडीच्या घटना घडल्या. सुदैवाने यात कोणाला ही दुखापत झाली नाही.
पुणे शहरात पुढील ३ ते ४ दिवस आकाश अंशत: ढगाळ राहून दुपारनंतर मेघगर्जनेसह, विजांचा कडकडाट, तुरळक ठिकाणी हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.