पुणे : शहरातील सात बड्या खासगी हाॅस्पिटल्सनी नर्सिंग होम ॲक्ट आणि इतर नियम पायदळी तुडवल्याचे आराेग्य विभागाच्या पथकाने अचानक दिलेल्या भेटीतून समाेर आले आहे. या प्रकरणी आरोग्य विभागाने कारण दाखवा, अशा नाेटीसही बजावली आहे.
सर्वसामान्यांकडून भरमसाट बिले उकळणाऱ्या या खासगी हाॅस्पिटल्सनी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे सर्रास उल्लंघन केल्याचे समाेर आले आहे. याप्रकरणी रुबी हॉल क्लिनिक, जहांगीर हॉस्पिटल, हीलिंग हँड्स क्लिनिक, केईएम हॉस्पिटल, ग्लोबल हॉस्पिटल, गुप्ते हॉस्पिटल, सिद्धी हॉस्पिटल व लॅप्रोस्कोपिक सेंटर यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
या नियमांखाली बजावली नाेटीस :
महाराष्ट्र नर्सिंग होम नोंदणी कायदा १९४९ आणि नियम २०२१, गर्भधारणापूर्व तपासणी कायदा, १९९४, वैद्यकीय गर्भपात कायदा २०२१, आसिस्टेड रिप्राॅडक्टिव्ह टेक्नाॅलाॅजी तंत्रज्ञान २०२१ आणि सरोगसी (नियमन) कायदा, २०२१. तसेच, जैववैद्यकीय कचरा नियम २०१६, संसर्ग नियंत्रण व प्रदूषण नियंत्रण तसेच आरोग्य सुविधा नियंत्रित करणाऱ्या इतर नियमांसह अग्निशमन नियमांचे पालन करण्यासाठी रुग्णालयांची तपासणी करून नाेटीस बजावली आहे.
तपासणीतून हलगर्जीपणा उघड :
या हाॅस्पिटल्सबाबत काही नागरिकांनी आणि रुग्णांनी आराेग्य खात्याकडे तक्रारी केल्या हाेत्या. त्यानंतर पुणे परिमंडळाच्या आराेग्य विभागाचे उपसंचालक डॉ. राधाकिशन पवार यांनी २० सप्टेंबरपासून डाॅक्टर आणि तज्ज्ञ व्यक्तींच्या पथकाच्या माध्यमातून सर्व प्रमुख खासगी रुग्णालयांना अचानक भेटी देऊन तपासणी सुरू केली होती. त्या तपासणीत हलगर्जीपणा आढळल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
...या नियमांचे केले उल्लंघन?
- रुग्णालयांच्या स्वागत कक्षात तक्रार नाेंदविण्यासाठी वही नसणे, तक्रार निवारण अधिकारी नसणे, विविध सेवांचे दरपत्रक नसणे.
- शस्त्रक्रियागृहात चार सिलिंडर, भूलयंत्र, बाॅइल्स ऑपरेटर, चार ऑक्सिजन सिलिंडर नसणे, दाेन खाटांमध्ये सहाऐवजी चार फुटांचे अंतर असणे.
- अतिदक्षता विभागात दाेन सक्शन मशिन्स व एक फुट सक्शन मशिन नसणे, नाेंदवही नसणे.
- शस्त्रक्रियागृहात कार्यरत डाॅक्टरचे नाव, शैक्षणिक अर्हता आदी आढळून आलेले नाही.
- बायाे मेडिकल वेस्टचे नियम पाळले न जाणे, यातील कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण न हाेणे.
- मुदतबाह्य इंजेक्शनचा साठा, परिचारिकांचे दुसऱ्या देशातील प्रमाणपत्र असणे, अग्निशामक विभागाचे नियम न पाळणे.
- मेडिकल टर्मिनेशन ॲक्टनुसार रुग्णांची नावे काेडिंगमध्ये गुप्त ठेवलेले नसणे.
- साेनाेग्राफी विभागासमाेर कलर बाेर्ड नसणे, गर्भवतींची माहिती भरलेली नसणे, अभिलेख आणि अल्ट्रसाउंड चिकित्सालय व इमेजिंग सेंटर
- साेनाेग्राफी अधिनियम काॅपी कक्षाबाहेर नसणे, साेनाेग्राफी मशिन्स विनावापर पडून असणे व ही बाब समूचित प्राधिकारी यांना न कळणे.
- चार महिन्यांवरील गर्भपाताच्या प्रकरणात दाेघांची संमती न घेणे.
- आठ खाटांसाठी एक ऑक्सिजन सिलिंडर नसणे, एआरटी सुधारित नियमानुसार नसणे.
रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांकडून आराेग्य विभागाकडे अनेक तक्रारी आल्या. त्यानंतर पाहणी केली असता अनेक रुग्णालये नर्सिंग होम ॲक्टच्या अनेक तरतुदींचे पालन करत नाहीत. सर्व रुग्णालयांनी नियमांचे पालन करावे आणि रुग्णांना चांगले उपचार मिळावेत हा या मोहिमेचा उद्देश आहे. ज्या रुग्णालयांनी नाेटिशीला उत्तर दिले त्यांची पुन्हा तपासणी केली जाईल, त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल.
- डाॅ. राधाकिशन पवार, आराेग्य उपसंचालक, पुणे परिमंडळ