पुणे : विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात बाहेरगावहून येणाऱ्या विद्यार्थ्यांची, विशेषत: विद्यार्थिनींची काेंडी होत आहे. कॉलेजची फी परवडली; पण होस्टेल नको, असे म्हणण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. त्याचवेळी दुसरीकडे राहायचे कुठे?, सुरक्षेचे काय? असाही प्रश्न त्यांना पडत आहे. काॅलेजचे हाेस्टेल बापाच्या खिशाला परवडेना आणि बाहेर राहायचं तर सुरक्षेची हमी मिळेना, या काेंडीत अडकल्याची त्यांची भावना झाली आहे. त्यामुळे सावित्रीच्या लेकींनी शिक्षण घ्यायचं तरी कसं, असा प्रश्न उपस्थित हाेत आहे.
बाहेरगावाहून येणारे बहुसंख्य विद्यार्थी आणि विद्यार्थिनी वसतिगृहांमध्ये राहतात. सरकारी वसतिगृहांमध्ये काहींना प्रवेश मिळताे. कॉलेजला वसतिगृह असते, पण तेही फुल्ल झालेले असते, खासगी वसतिगृहांमध्ये राहायचे तर कॉलेजच्या फीपेक्षाही जास्त पैसे द्यावे लागतात, असे परगावहून पुण्यात शिक्षणासाठी आलेल्या अनेकांनी सांगितले. याशिवाय रोजच्या खाण्याचा खर्च असतो तो वेगळाच. यावर उपाय म्हणून पेईंग गेस्टची पद्धत आहे. यात काही कुटुंबांनी स्वमालकीच्या जागेत वरच्या मजल्यावर मुलींसाठी खोल्या तयार केल्या आहेत. एका खोलीत साधारण ३, ४ मुलींना किंवा ३, ४ मुलांना जागा दिली जाते. प्रत्येकाकडून स्वतंत्र पैसे घेतले जातात. हे दरही लॉकडाऊननंतर बरेच वाढले आहेत. तेही परवडत नाही, असे काही मुलींनी सांगितले.
होस्टेलच्या किमतीत ३० टक्के वाढ :
खासगी वसतिगृहात आधीच तीन महिन्यांचे भाडे जमा करावे लागते. मध्येच काही कारणाने ते सोडले तर आगाऊ जमा केलेले भाडे परत दिले जात नाही. खासगी होस्टेलमध्ये राहणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींबराेबर संवाद साधला असता होस्टेलच्या किमतीत साधारणत: ३० टक्के वाढ झाली आहे. ज्या वसतिगृहाची वार्षिक फी ६० ते ७० हजार होती. तीच आता १ लाख ते १ लाख २० हजार इतकी वाढली आहे, असे समजले. पेईंग गेस्ट म्हणून राहणाऱ्यांनी देखील लॉकडाऊनमध्ये त्याचे नुकसान झाले या कारणावरून पैसे वाढवले आहेत. रोजच्या जेवणाचा खर्चही दरमहा काही हजार रुपयांपर्यंत होतो. इतके पैसे दिल्यानंतरही स्वच्छ जागा, सूर्यप्रकाश, स्वच्छतागृह, पुरेसे पाणी, अशा साध्या सुविधाही पेईंग गेस्ट म्हणून राहिल्यावर मिळत नाहीत असाच अनेक मुलींचा अनुभव आहे.
पैसे देऊनही त्रासच :
मित्र आणायचे नाही, रात्री जागरण करायचे नाही, आवाज करायचा नाही अशी अनेक बंधने टाकली जातात. त्याला विरोध केला की लगेच जागा खाली करण्याचा तगादा लावला जातो. त्यामुळे पैसे देऊनही त्रासच सहन करावा लागतो, असे पेईंग गेस्ट म्हणून राहणाऱ्यांनी सांगितले.
दरांवर नियंत्रण कधी?
उच्च शिक्षणासाठी पुण्यात येणाऱ्या बहुतांश विद्यार्थ्यांना खास करून मुलींना सुरक्षित, स्वच्छ आणि परवडेल अशा दरात राहण्याची सुविधा मिळवणे हीच सर्वात मोठी अडचण झाली आहे. सरकारने ही बाब लक्षात घेऊन सरकारी वसतिगृहे वाढवावीत, खासगी वसतिगृहांच्या दरांवर नियंत्रण ठेवावे आणि पेईंग गेस्टची सुविधा देणाऱ्यांवरही किती भाडे घ्यायचे याबाबत बंधन टाकावे, अशी पालकांची अपेक्षा असल्याचे दिसते आहे.