पुणे : वाहनांना उच्च सुरक्षा क्रमाकांच्या पाट्या (हाय सिक्युरिटी नंबर प्लेट) बसवण्याची सक्ती काही गुजराती कंपन्यांची तिजोरी भरण्यासाठी करण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवर) पक्षाने केला आहे. केंद्र सरकारने ही सक्ती केली आहे. त्यातही अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात या पाट्यांची किंमत दुप्पट ठेवण्यात आली असल्याची टीका करून पक्षाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही या प्रकारच्या पाट्यांना तीव्र विरोध केला आहे.पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले की केंद्र सरकराने देशातील सर्व दुचाकी ते चारचाकी वाहनांना विशिष्ट प्रकारचे बोध चिन्ह असलेल्या पाट्याच बसवण्याची सक्ती केली आहे. या बोधचिन्हाच्या माध्यमातून वाहनाची ओळख पटवणे सुलभ असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. सन २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांना या पाट्या बसवणे बंधनकारक करण्यात आले आहे. देशातील अन्य राज्यांपेक्षा या पाट्यांची किंमत महाराष्ट्रात दोनपट ते तीनपट आहे. गुजरातमधील काही कंपन्यांना या पाट्या तयार करण्याचे काम देण्यात आले असून या सक्तीच्या माध्यमातून त्या कंपन्यांची तिजोरी भरली जाणार आहे.
एचएसआरपी पाटीची सक्ती गुजराती कंपन्यांच्या भल्यासाठी; राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
By राजू इनामदार | Updated: March 5, 2025 15:19 IST