कळस (पुणे) : सणसर (ता. इंदापूर) येथील विवाहित पत्नीचा शारीरिक व मानसिक छळ करून तू वेडी आहेस म्हणणाऱ्या पतीस इंदापूर न्यायालयाने दोन महिने कारावास व दहा हजार रुपयांचा दंडाची शिक्षा सुनावली. सणसर येथील विवाहित महिलेला पती व सासरच्या मंडळीकडून तू वेडी आहे, तुला आम्हाला नांदवायचे नाही. तुम्ही लग्नात मान दिला नाही. तसेच फिर्यादी महिलेस वेळोवेळी उपाशी पोटी ठेवून शारीरिक व मानसिक त्रास देऊन शिवीगाळ दमदाटी करत हाताने लाथा बुक्क्यांनी मारहाण केली होती.
फिर्यादी महिलेच्या तक्रारीवरुन पती, सासू-सासरे व इतर ३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्यांच्या तपासासाठी सहाय्यक पोलिस निरीक्षक विक्रम साळुंखे, पोलीस हवालदार वसंत वाघुले, न्यायालय अंमलदार सचिन खुळे पोलिस उपनिरीक्षक रतिलाल चौधर यांनी सहकार्य केले.
न्यायालयाने आरोपी पती अतूल बापूराव काळे वय (२६)वर्षे यांना दोषी ठरवले असून सासु सासरे व इतर आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. पतीला दोन महिने साधा कारावास व दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला असून दंड न भरल्यास २० दिवस कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
या खटल्यात सरकारी पक्षाकडून अॅड अमरदीप लोहकरे यांनी प्रभावीपणे बाजू मांडली. न्यायाधीश के सी कलाल प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी इंदापूर यांनी फिर्यादी पक्षाचा पुरावा उचित ठरवत आरोपी पती यांच्याकडून पत्नीवर झालेला मानसिक व शारीरिक छळाप्रकरणी दोन महिने कारावास व दहा हजार रुपयांचा दंड शिक्षा ठोठावण्यात आली.