पुणे : पाळीव श्वानाला दगड मारल्याने झालेल्या वादातून एकावर कुऱ्हाडीने वार केल्याची घटना बाणेर भागात घडली. या प्रकरणी श्वानमालक अयुब बाशा शेख (वय ३६, रा. शिंदे मळा, बाणेर) याला चतु:शृंगी पोलिसांनी अटक केली.
शेख याने केलेल्या हल्ल्यात रवी घोरपडे (वय ४०, रा. शिंदे मळा, बाणेर) गंभीर जखमी झाला आहे. शेख बिगारी काम करतो. घोरपडे रंगारी आहे. दोघेही शिंदे मळा भागातील वस्तीत राहायला असून एकमेकांचे परिचित आहेत.
घोरपडे शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास शिंदे मळा परिसरातून निघाला होता. त्यावेळी शेख याचा पाळीव श्वान घोरपडे याच्यावर भुंकला. घाेरपडेने श्वानाला दगड मारला. यावरून दोघांमध्ये वाद झाला. शेखने घोरपडे याच्यावर कुऱ्हाडीने वार केले. शेखने केलेल्या हल्ल्यात घोरपडे गंभीर जखमी झाला. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी शेखला अटक केली असून न्यायालयाने शेखला ४ दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे तपास करत आहेत.