पुणे : सुनेवर अघोरी प्रयोग करुन छळ करणार्या तसेच सावकारीच्या माध्यमातून अनेकांना लुबाडणार्या विविध गुन्ह्यांसह मोक्का कारवाई करण्यात आलेल्या उद्योजक नाना गायकवाड याच्यावर एका कैद्याने पत्र्याच्या तुकड्याने येरवडा कारागृहात दोन महिन्यांपूर्वी हल्ला केला होता. तशाच पद्धतीने चौघांनी या कैद्यावर हल्ला करुन जखमी केले आहे. सुरेश बळीराम दयाळु असे जखमी झालेल्या कैद्याचे नाव आहे. याप्रकरणी तुरुंगाधिकारी रेवणनाथ कानडे यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अस्लम बशीर मुजावर, सिद्धार्थ अंकुश यमपुरे, अजय विजय पायगुडे, सौरभ गणेश सावळे या न्यायालयीन बंदीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना येरवडा कारागृहातील टिळक मंडल कार्यालयाच्या मुख्य फाटकाजवळ मंगळवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औंध येथील उद्योजक नाना गायकवाड व त्याच्या कुटुंबावर सुनावर अघोरी प्रयोग करुन छळ केल्याचा गुन्हा दाखल होता. त्यानंतर तो व त्याचा मुलगा फरार झाला होता. बेकायदा सावकारीच्या माध्यमातून त्याने अनेकांना लुबाडले होते. त्याच्यावर खंडणी, जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे अनेक गुन्हे असून त्याच्या टोळीवर मोक्का कारवाई करण्यात आली आहे. तो कारागृहात असताना ३फेब्रुवारी रोजी सकाळी पावणे बाराच्या सुमारास नाना गायकवाड खोलीसमोर खुर्चीवर बसला होता. त्यावेळी सुरेश दयाळु याने लोखंडी पत्र्याच्या तुकड्याने गायकवाड याच्या उजव्या गालावर वार केला होता. येरवडा पोलिसांनी सुरेश दयाळु याच्यावर गुन्हा दाखल केला होता.
अस्लम मुजावर याच्याबरोबर सुरेश दयाळु याची पूर्वी भांडणे झाली होती. मुजावर इतर आरोपींवर खून, खंडणीचे गुन्हे दाखल आहेत. मुजावर याने इतर आरोपींशी संगनमत करुन सुरेश याला हाताने धक्काबुक्की केली. बशीर मुजावर याने भत्ता पेटीच्या तुटलेल्या पत्र्याच्या तुकड्याने सुरेश याला मारहाण करुन जखमी केले. पोलीस उपनिरीक्षक काटे तपास करीत आहेत.