पुणे : पाच वर्षांपूर्वी बंद पडलेली पुणे - मुंबई विमानसेवा अखेर उद्यापासून पूर्ववत होत आहे. एअर इंडियामार्फत ही सेवा सुरू करण्यात आली असून, पहिल्याच विमानाला प्रवाशांचा प्रतिसाद देखील चांगला मिळाल्याचे एअर इंडियातर्फे सांगण्यात आले. २०१९ साली जेट एअरलाईन्स मार्फत पुणे - मुंबई थेट विमानसेवा चालवली जात होती. २०१९ साली ही सेवा बंद करण्यात आली. त्यानंतर पुणे - मुंबई - पुणे प्रवास फक्त रोडनेच करता येत होता. पण आता विमानसेवा पूर्ववत झाल्याने ज्यांना कमी वेळेत मुंबई गाठायची आहे, त्यांना याचा फायदा होणार आहे.
पुणे ते मुंबई तिकीट दर असे..(एअर इंडियाच्या संकेतस्थळावरून)- इकॉनॉमी - २ हजार २३७- सुपर व्हॅल्यू इकॉनॉमी - ३ हजार ७३८- फ्लेक्सी सेव्हर इकॉनॉमी - ६ हजार ५७३- फ्लेक्झीबल इकॉनॉमी - ११ हजार ८२३
मुंबई ते पुणे तिकीट दर असे..- इकॉनॉमी - १ हजार ९२२- सुपर व्हॅल्यू इकॉनॉमी - ३ हजार ४२३- फ्लेक्सी सेव्हर इकॉनॉमी - ६ हजार २५८- फ्लेक्झीबल इकॉनॉमी - ११ हजार ५०८
रस्त्याने वेळ जातो, पण पैसे वाचतात...पुणे ते मुंबई १५० किलोमीटरचे अंतर रस्त्याने जाण्यासाठी साधारण तीन तासांचा कालावधी लागतो. चारचाकीने जाण्यासाठी १ हजार रुपयांचे पेट्रोल लागते. तसेच मुंबई - पुणे एक्स्प्रेस वे सुस्थितीत असल्याने कार, बस चा प्रवास देखील आरामाचा होतो. त्यामुळे या विमानसेवेचा वापर किती सर्वसामान्य नागरिकांना होणार हा प्रश्न आहे. त्यातच विमान प्रवास देखील १ तासांचा असला तरी विमानतळावर किमान एक तास आधी पोहोचावे लागते. त्यामुळे घरातून निघताना आणखीनच लवकर निघावे लागणार आहे. तेवढ्या वेळेत व्यक्ती कारने मुंबईला पोहोचत असल्याने याचा फायदा फक्त ठराविच लोकांना होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.
- शनिवार व्यतिरिक्त सहा दिवस विमान घेणार उड्डाण
- मुंबईहून पुण्याला सकाळी ०९:४५ वाजता विमान उड्डाण घेणार
- पुण्याला एका तासात १०:४५ वाजता होणार लँड
- पुण्याहून मुंबईला सकाळी ११:२० मिनिटांनी (विमान नंबर एआय ६१४) घेणार उड्डाण
- मुंबईला एका तासात १२:२० मिनिटांनी होणार लँड
- ११४ इकॉनॉमी क्लासचे सीट- ८ बिझनेस क्लास सीट
आधीची विमानसेवा बंद झाल्यानंतर, इकॉनॉमी क्लास असलेली विमानसेवा या मार्गावर गरजेची होती. सकाळच्या विमानसेवेला भरघोस प्रतिसाद मिळाल्यावर संध्याकाळची पण सेवा भविष्यात सुरू होऊ शकेल.- धैर्यशील वंडेकर, हवाई वाहतूक तज्ञ