पुणे : पुणे फिल्म फाउंडेशन, सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन व दादासाहेब फाळके चित्रनगरी, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने २३वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२५ यंदा १३ ते २० फेब्रुवारीदरम्यान पार पडणार आहे. पीव्हीआर, पॅव्हिलियन मॉल, बंडगार्डन येथील आयनॉक्स आणि सिनेपोलीस-औंध येथील ११ स्क्रीन्समध्ये महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. जागतिक व मराठी चित्रपट स्पर्धात्मक विभाग आणि अन्य विभागांमध्ये सुमारे १५०हून अधिक भारतीय-परदेशी चित्रपट रसिक प्रेक्षकांना पाहता येणार असल्याची माहिती ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक व पुणे फिल्म फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल यांनी पत्रकार परिषेदत दिली.
याप्रसंगी ज्येष्ठ चित्रपट समीक्षक व चित्रपट निवड समितीचे अध्यक्ष समर नखाते, विश्वस्त डॉ. मोहन आगाशे, विश्वस्त डॉ. सतीश आळेकर, चित्रपट निवड समितीचे सदस्य अभिजित रणदिवे, उपसंचालक विशाल शिंदे (प्रोग्रॅम व फिल्म), उपसंचालक अदिती अक्कलकोटकर (आंतरराष्ट्रीय संपर्क व समन्वय) उपस्थित होते.
यंदा प्रख्यात कलाकार राज कपूर यांचे जन्मशताब्दी वर्ष असून, या वर्षीची थीम असणार आहे. त्यांच्यासह प्रख्यात संगीतकार मोहम्मद रफी, तामिळ चित्रपटातील ए.नागेश्वरराव, संगीतकार तलक मेहमूद, पश्चिम बंगालमधील प्रसिद्ध दिग्दर्शक तपन सिन्हा यांचेदेखील शताब्दी वर्ष आहे. जागतिक चित्रपट स्पर्धात्मक विभागात यंदा १०७ देशांमधील १०५० हून अधिक चित्रपटांनी सहभाग नोंदवला होता. परीक्षक मंडळाने हे सर्व चित्रपट बघून त्यातील १४ चित्रपटांची अंतिम फेरीसाठी निवड केली आहे. आंतरराष्ट्रीय परीक्षकांमार्फत अंतिम फेरीतील हे १४ चित्रपट बघून सर्वोत्कृष्ट आंतराष्ट्रीय चित्रपट निवडला जाईल. त्यास ‘महाराष्ट्र शासन संत तुकाराम सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार’ देण्यात येणार असून, पुरस्काराचे स्वरूप १० लाख रुपये रोख रक्कम आहे. हा पुरस्कार महोत्सवाच्या समारोप वेळी दिला जाणार आहे.
जागतिक चित्रपट स्पर्धा विभागात निवडण्यात आलेल्या चित्रपटांची यादी
१. डार्केस्ट मीरियम, दिग्दर्शक- नाओमी जये, कॅनडा२. ऑन द इन्व्हेंशन ऑफ स्पीशीज, दिग्दर्शक - तानिया हरमीड, इक्वाडोर, क्यूबा३. टू अ लँड अननोन, दिग्दर्शक - महदी फ्लेफेल, युनायटेड किंगडम, फ्रान्स, जर्मनी, नेदरलँड, ग्रीस, कतार, सौदी अरेबिया, पॅलेस्टाइन४. ग्रँड टूर, दिग्दर्शक - मिगुएल गोम्स, पोर्तुगाल, इटली, फ्रान्स५. अरमंड, दिग्दर्शक - हलफदान उल्लमांन तोंडेल, नॉर्वे, नेदरलँड, जर्मनी, स्वीडन६. सेक्स, दिग्दर्शक - डॅग जोहान हाउगेरूड, नॉर्वे७. इलेक्ट्रिक फील्ड्स, दिग्दर्शक - लिसा गेर्ट्सच, स्वित्झर्लंड८. अंडर द वोल्केनो, दिग्दर्शक - डेमियन कोकूर, पोलंड९. ए ट्रॉवेलर्स नीड्स, दिग्दर्शक - हाँग सांगसू , दक्षिण कोरिया१०. ब्लॅक टी, दिग्दर्शक - अब्दर्रहमान सिसाको, फ्रान्स, मॉरिटानिया, लक्झेंबर्ग, तैवान, आयव्हरी कोस्ट११. सम रेन मस्ट फॉल, दिग्दर्शक - यांग क्यू, चीन, अमेरिका, फ्रान्स, सिंगापूर१२. एप्रिल, दिग्दर्शक - डी कुलुंबेगश्वील, फ्रान्स, इटली, जॉर्जिया१३. थ्री किलोमीटर्स टू द एंड ऑफ द वर्ल्ड्स, दिग्दर्शक - एमानुअल पर्वू, रोमानिया१४. इन रिट्रीट, दिग्दर्शक - मैसम अली, इंडिया