पुणे: पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन (Pune International Marathon) स्पर्धेत दरवर्षी लाखोंच्या संख्येने खेळाडू सहभागी होतात. कोरोना महामारीने या स्पर्धेत खंड पडला होता. पण सध्या कोविडची साथ ओसरत आहे. तरीदेखील स्पर्धकांच्या आरोग्यविषयक सुरक्षेशी कोणतीही तडजोड न करण्याच्या प्रतिबद्धतेमुळे नेहमीप्रमाणे डिसेंबर महिन्याच्या पहिल्या रविवार ऐवजी पुढील वर्षी २७ फेब्रुवारीला ही शर्यत आयोजित करण्यात येणार आहे. पुणे महापालिकेशी योग्य तो समन्वय साधून तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या कोविड सुरक्षेशी संबंधित सर्व नियमांचे काटेकोर पालन करून ही शर्यत होईल. अशी माहिती पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन शर्यतीच्या संयोजन समितीचे अध्यक्ष अभय छाजेड (Abhay Chajed) यांनी दिली आहे.
या शर्यतीसाठी १५ ऑक्टोबरपासून (online) नावनोंदणीला सुरुवात होणार आहे. बाबुराव सणस मैदान ते नांदेड सिटी या नव्या मार्गावर २ लूपमध्ये ही शर्यत होईल. यंदा कोरोनाचा धोका लक्षात घेता १४, १६ आणि १८ वर्षांखालील गटाच्या शर्यती होणार नाहीत. केवळ १८ वर्षे वयोगटापुढील पुरुष व महिला स्पर्धकांसाठी ४२, २१, १० आणि ५ किलोमीटर बरोबरच व्हीलचेअर अशा पाच गटांच्याच शर्यती होणार आहेत. अशी माहिती पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन शर्यतीचे सहसंचालक गुरुबन्स कौर यांनी दिली.
शर्यतीत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी www.marathonpune.com या संकेतस्थळाला भेट द्यावी. तेथे शर्यती संदर्भातील सर्व माहिती उपलब्ध असेल. ३१ जानेवारीपर्यंत नावनोंदणी करता येईल. ३० नोव्हेंबरपर्यंत नोंदणी करणाऱ्या स्पर्धकांना आकर्षक अर्ली बर्ड डिस्काउंट देण्यात येईल. याबाबतची सविस्तर माहिती वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
स्पर्धेविषयी अधिक माहिती - दोन डोस (corona vaccine) पूर्ण झालेल्या १८ वर्षांपुढील स्पर्धकांनाच प्रवेश असणार- नावनोंदणी केलेल्यांना रनिंग किट घरपोच मिळेल.- शर्यतीच्या मार्गावरील प्रत्येक पॉईंटवर सॅनिटायझेशन युनिट आणि तापमान मोजण्याची सुविधा उपलब्ध असेल.- प्रत्येक गटाची शर्यत वेगळी सुरू होईल.- केवळ एलिट गटाचा फ्लॅग ऑफ होईल. इतर गटांतील स्पर्धक आखून दिलेल्या कालावधीत त्यांच्या सोईनुसार शर्यत सुरू करू शकतील.- पारितोषिक वितरण होणार नाही- विजेत्या खेळाडूंची ट्रॉफी घरपोच पाठवण्यात येईल. विदेशी खेळाडूंची ट्रॉफी त्यांच्या निवासस्थानी पोहचविण्यात येईल.