पुणे : राजस्थानमधून येणारे थंड वारे आणि हिमालयीन पर्वत रांगांवर होत असलेली बर्फवृष्टी याचा एकत्रित परिणाम होऊन उत्तरेपाठोपाठ महाराष्ट्रातील किमान तापमानात घट झाली आहे. राज्यात सर्वांत कमी किमान तापमान पुणे येथे १२.६ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे. सरासरीच्या तुलनेत हे ३.२ अंशाने घटले आहे.
गेल्या चार दिवसांपासून राज्यातील तापमानात सातत्याने घट होत आहे. मध्य महाराष्ट्रातील तुरळक ठिकाणच्या किमान तापमानात लक्षणीय घट झाली आहे. मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी तर कोकण, गोवा व विदर्भात काही ठिकाणी किंचित घट झाली आहे.
पुणे शहरातील तापमानात गेले काही दिवस सातत्याने घट होत आहे. रविवारी सकाळी १२.६ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले. गेल्या १० वर्षांत ३० ऑक्टोबर २०१६ रोजीच शहरातील किमान तापमान १२ अंश सेल्सिअस इतके कमी झाले होते. आजची ही दशकातील दुसरी निचांकी किमान तापमान आहे. देशात सीकर (पूर्व राजस्थान) आणि मंडला (पूर्व मध्य प्रदेश) येथे मैदानी भागात किमान तापमान ११ अंश सेल्सिअस नोंदवले गेले.
राज्यातील प्रमुख शहरातील किमान तापमान (अंश सेल्सिअस) पुणे १२.६, लोहगाव १४.७, जळगाव १४, कोल्हापूर १७.७, महाबळेश्वर १३.८, नाशिक १३.३, सांगली १७.२, सातारा १४.३, सोलापूर १६.१, मुंबई २४, सांताक्रूझ २०.५, रत्नागिरी २२.२, पणजी २२.८, डहाणू २०.३, उस्मानाबाद १५.२, औरंगाबाद १३, परभणी १५.४, नांदेड १६.४, अकोला १७.८, गोंदिया १७, नागपूर १६.८