पुणे - भोसरीतील एका संपूर्ण कुटुंबाने आत्महत्या केल्याची घटना समोर असताना बाणेर-पाषाण लिंक रोडवर एका आयटी इंजिनिअरने पत्नी व चार वर्षाच्या मुलासोबत आपलं आयुष्य संपवल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. या घटनेत आयटी इंजिनिअरनं पत्नी व मुलाची हत्या करुन नंतर आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
जयेश कुमार पटेल (वय 34 ), भूमिका पटेल (वय 30 ) व अक्षय पटेल ( वय 4) अशी त्यांची नावे आहेत. वसंत विहार सोसायटीमधील ही घटना असून या तीन जणांचे मृतदेह ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. जयेशकुमार पटेल हे आयटी इंजिनिअर आहेत. महिना दीड लाख रुपये पगारावर ते एका नामांकित कंपनीत नोकरी करत होते, तर त्यांची पत्नी गृहिणी होती. दरम्यान गेल्या दोन दिवसांपासून त्यांचे घर बंद होते. संशय आल्यानं शेजार्यांनी पोलिसांच्या नियंत्रण कक्षला रात्री 11 वाजण्याच्या सुमारास याची माहिती दिली. यानंतर चतु:शृंगी पोलिसांनी धाव घेतली. दुसऱ्या इमारतीच्या बालकनीतून पोलीस पटेल यांच्या घराजवळ पोहोचले. दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यावेळी पोलिसांनी संपूर्ण कुटुंब मृतावस्थेत आढळलं.
पती-पत्नीच्या गळ्याभोवती दोरीचे व्रण दिसत आहेत, तर मुलगा अक्षयच्या तोंडातून फेस आला होता. त्यामुळे एकाच वेळी दोघांनी गळफास घेतला असावा किंवा पतीचा व मुलाची हत्या करून नंतर जयेश कुमारनं आत्महत्या केली असावी असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यांचे मृत्यदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.
दरम्यान पुणे शहर आत्महत्येच्या घटनांनी हादरून गेले आहे. भोसरीत एकाच कुटुंबात तिघांनी आत्महत्या केली. तर त्याचवेळी हिंजवडीत नर्सने आत्महत्या केली. येरवड्यातही एकाने आत्महत्या केली. आता आयटी इंजिनीअरने पत्नी व मुलासह आत्महत्या केल्याने शहरात खळबळ माजली आहे.