पुणे : जेल ओपनिंग ड्युटीसाठी जात असताना, येरवडा करागृहातील तुरुंग अधिका-यावर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी भर रस्त्यात गोळीबार केला. हल्लेखोरांचा निशाना चुकल्याने अधिकारी थोडक्यात बचावले. छत्रीच्या साह्याने प्रतिकार केल्याने दोन्ही हल्लेखोरांनी तेथून पळ काढला. शुक्रवारी सकाळी सहा वाजून २० मिनिटांनी कारागृहाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून ५० मीटर अंतरावर असलेल्या पार्किंगसमोर हा प्रकार घडला.येरवडा मध्यवर्ती कार्यालयात श्रेणी-२ तुरुंगाधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या मोहन पाटील (वय ३५) यांच्यावर हा खुनी हल्ला झाला. पाटील यांना धमकावण्याच्या दृष्टीने हा प्रकार केला असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. हल्ला करणारे दोघे हल्लेखोर स्कूटरवरून जाताना सीसीटीव्ही कॅमेºयात कैद झाले आहेत. पोलिसांना घटनास्थळावरून एक पुंगळी आढळली आहे.पाटील हे येरवडा कारागृहाच्या आवारातील क्वॉर्टरमध्ये राहातात. ते नेहमीप्रमाणे सकाळी सहाच्या जेल ओपनिंग ड्युटीसाठी कारागृहाकडे निघाले होते. पायी जात असताना समोरून वळून दुचाकीवरून दोघे त्यांच्याजवळ आले. यातील मागे बसलेल्याने त्याच्याजवळील पिस्तूल बाहेर काढून त्यांच्यावर गोळी झाडली. मात्र, हल्लेखोरांचा निशाना चुकल्यामुळे ते बचावले. गोळीबार झाल्याचे लक्षात येताच पाटील यांनी धाडस दाखवत हातातील छत्रीने दोघांना प्रतिकार केला. यामुळे गडबडून गेलेल्या आरोपींनी तेथून पळ काढला. यानंतर, पाटील यांनी तातडीने या प्रकाराची माहिती येरवडा कारागृह प्रशासनाला दिली.
पुण्यात तुरुंग अधिकाऱ्यावर कारागृहाजवळच गोळीबार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2018 2:43 AM