पुणे : प्रक्षोभक व चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी कालिचरण महाराज याला न्यायालयाने शुक्रवारी 25 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर केला आहे. कालिचरण याने न्यायालयीन कोठडीत रवानगी झाल्यावर गुरुवारी (दि. ६) प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. रामदिन यांच्या न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला. त्यावर सरकार पक्षातर्फे पोलिस व सहायक सरकारी वकील श्रीधर जावळे यांनी लेखी म्हणणे सादर केले होते.
आरोपीचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असून, त्याने दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. आरोपीला जामीन झाल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. या प्रकरणातील अन्य आरोपी फरार असून, कालिचरणला जामीन झाल्यास या आरोपींना मदत होईल. त्यामुळे जामीन नाकारण्यात यावा, असे म्हणणे सहायक सरकारी वकील श्रीधर जावळे यांनी सादर केले. त्यावर शुक्रवारी पुन्हा सरकार व बचाव पक्षातर्फे अंतिम युक्तिवाद झाला. कालिचरण याच्यावतीने अॅड. अमोल डांगे यांनी जामीन अर्ज दाखल केला. आरोपीकडून सर्व तपास पूर्ण झाला आहे. त्यामुळे कस्टडी ची गरज नाही, असा युक्तिवाद अॅड डांगे यांनी केला. त्यावर आरोपीने साक्षीदारांना धमकावू नये. दोषारोपत्र दाखल होईपर्यंत आरोपीने पोलीस स्टेशनला हजेरी लावावी अशा अटी शर्तीवर न्यायालयाने कालिचरणला जामीन मंजूर केला आहे. समस्त हिंदू आघाडी संघटनेतर्फे १९ डिसेंबर २०२१ रोजी शुक्रवार पेठेतील नातूबाग मैदानावर आयोजित ‘शिवप्रताप दिन अर्थात अफजलखान वधाचा आनंदोत्सव’ कार्यक्रमात दोन समाजात जातीय तेढ निर्माण होईल, असे प्रक्षोभक व चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी कालिचरण याच्यासह पाच जणांवर खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.